घाणेरडे राजकारण करू नका ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट असताना अशा परिस्थितीत राजकारण न करता महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी सर्वांनी उभे राहा, त्यांना सहकार्य करावे असे आवाहन केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.मात्र अशा संकटात घाणेरडे राजकारण कोणी करू नका अशा शब्दात नाव न घेता विरोधी पक्षांतील नेत्यांवर त्यांनी आपल्या ठाकरी शैलीत प्रहार केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमाध्यतुन राज्यातील जनतेशी संवाद साधला.यावेळी त्यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण न करता सर्वांनी महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी उभे राहावे आणि सहकार्य करावे,हे आवाहन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानून धन्यवाद दिले.तर अशा कठिण समयी सरकार कमी पडत नसून,आज जी लढाई आहे, अशा वेळी सर्वांनी जात पात बाजूला ठेवून एकत्र झाले पाहिजे.माणूस म्हणून एकत्र आले पाहिजे.मी राजकारण बाजूला ठेवून संकटाशी सामना करण्याचा प्रयत्न करीत आहे.आपण राजकारण करीत बसलो तर आपल्याला दुस-या कोणत्या शत्रूची गरज भासणार नाही.निवडणुका येतील जातील,सत्ता येते आणि जाते पण जीव गेलेला परत येत नाही असे सांगतानाच यामध्ये कोणी घाणेरडे राजकारण करू नका अशा शब्दात नाव न घेता त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना सुनावले.

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आज एकोपा आहे.एकोपा असतानाही काही जण राजकारणातच गुंतले आहेत.मी याकडे लक्ष देत नाही, पण काही जण मला सांगतात, तुम्ही काम करताय, पण ते राजकारण करत बसले आहेत.ज्यांना राजकारण करायचंय, त्यांना करु देत, तो त्यांचा विषय आहे, असा टोलाही मुख्यमंत्री  ठाकरे यांनी विरोधी पक्षांना लगावला.केंद्रीय मंत्री याची तारीफ करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी हिंदीत संवाद साधला. मी मुद्दाम हिंदीत बोललो, कारण थोडे वरपर्यंत कळेल,की मी तुमची तारीफ केली. मी सगळे मोकळेपणाने बोलतो, असें मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्र्याच्या विधानपरिषद सदस्यत्वावरुन गेले काही दिवस राज्यात  राजकारण रंगले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी गडकरींचे आभार मानत विरोधकांनाच उत्तर दिल्याची चर्चा आहे.केंद्रातील पथक राज्यातील करोनाविषयीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यात आले आहे. त्याचा धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले.मुंबईत काय चाललं आहे, चाचण्या कमी केल्यात का, लपवाछपवी सुरू आहे का असें बोलले जात आहे.आम्ही यामध्ये काहीही लपवलेले नाही. काही जणांनी मला सांगितले. बघा, केंद्राचे पथक आलेले आहे. दाल में कुछ काला हो सकता है ? मी त्यांना सांगितले की, आम्ही त्यांच्याकडूनच डाळ मागतोय. कारण अजूनही अन्न सुरक्षा योजनेतंर्गत धान्य वाटायचे आहे. त्यात फक्त तांदूळ आहे. गहू आणि डाळ हवी आहे. दाल में काला बाद में, पहले दाल तो आने असे सांगत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या कामावर निशाणा साधला.

Previous articleकोरोना बाधीतांचा आकडा वाढला ८११ नवीन रुग्ण ; रुग्णांची संख्या ७६२८ वर
Next articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले….लॉकडाऊन केव्हा संपणार ?