अन्यथा दारुंची दुकाने बंद करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबईत रेड झोनमधील कॅन्टॉनमेंट झोन वगळता दारु विक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यामुळे कालपासून  ठिकठिकाणी दारूच्या दुकांनासमोर लोकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. पोलिसांना या गर्दीवर नियंत्रण आणण्याची वेळ आली. कोरोनाच्या परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला, त्यामुळे दारूंच्या दुकांना समोरील गर्दीला आळा घालून ही गर्दी नियंत्रणात आणावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज मुंबईच्या सहपोलिस (गुन्हे) चौबे यांच्याकडे केली आहे.

कोरोनासारखी संकटाची परिस्थिती असताना व पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेचे आधीच प्रचंड ताण असताना सध्या पोलिसांची कुमक दारू दुकांनासमोरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी वापरली जात आहे.दारु विक्रींच्या दुकांनासमोर काल आणि आज मुंबई व मुंबई उपनगरात हजारोंची गर्दी होती. त्यामध्ये सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळण्यात आलेले नाहीत. अश्या परिस्थितीत कोरोना वाढण्याची भीती अधिक आहे. मुंबईकरांसाठी धोक्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे ही गर्दी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने तात्काळ कारवाई करावी अन्यथा दारुची दुकाने बंद करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी केली आहे.

Previous articleवाचा सुधारित आदेश : कोणत्या शासकीय कार्यालयात किती कर्मचा-यांची हजेरी आवश्यक आहे  
Next articleविद्यापीठ,महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर होणार