राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावाची घोषणा

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाघ्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा आज केली असून, अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीतर्फे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह अमोल मिटकरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होत आहे.यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, माजी मंत्री आणि साता-याचे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे आणि अकोल्याचे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन उत्तम कामगिरी बजावतील याची खात्री मला आहे असा विश्वास प्रदेशाघ्यक्ष जयंत पाटील यांनी नावांची घोषणा करताना व्यक्त केला आहे.

शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गो-हे यांना उमेदवारी  जाहीर करण्यात आली आहे.भाजपकडून नागपूरचे माजी महापौर प्रविण दटके,गोपीचंद पडळकर,रणजीतसिंह मोहिते पाटील आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर  काँग्रेसकडून काँग्रेस प्रदेश सचिव राजेश राठोड आणि बीड जिल्ह्याचे अध्यक्ष  राजकिशोर उर्फ पापा मोदी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ९ जागांसाठी आता १० उमेदवार झाल्याने निवडणूक अटळ असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसने एकाची उमेदवारी मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते प्रयत्नशील आहेत.महाविकास आघाडीचे उमेदवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, येत्या १४ मे रोजी ही निवडणूक बिनविरोध होणार का हे स्पष्ट होईल.

Previous articleकोरोनाच्या लढाईस यश… पुन्हा लढण्यास सज्ज : जितेंद्र आव्हाड
Next articleठरलं…विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार