मुंबई नगरी टीम
मुंबई : सध्या राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.राज्यातील मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्याबरोबरच त्यांना पालकत्व देण्यात आलेल्या जिल्ह्याचा आढावा घेताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.राज्यात असलेल्या टाळेबंदीमुळे उपहारगृह आणि दुकाने बंद असल्याने मंत्र्यांना आपल्या दौ-यात घरातूनच भाकरी बांधून घ्यावी लागत आहे.राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा असाच एक फोटो सध्या समाज माध्यमात धुमाकूळ घालत आहे.
राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्याच्या शिक्षणमंत्री यांना शिक्षण विभागाकडे लक्ष देत असतानाच त्यांच्या धारावी या कोरोनाने थैमान घातलेल्या मतदार संघाकडेही लक्ष द्यावे लागत आहे.धारावीमध्ये दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.धारावी मध्ये उपाय योजना करण्यासोबतच शालेय शिक्षण विभागाच्या विविध महत्वाचे निर्णय घेण्यासाठी गायकवाड यांना धावपळ करताना राज्यातील जनता पाहत आहे.वर्षा गायकवाड या हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्याने विविध बैठकांना हजेरी लावण्यासाठी त्यांना मुंबई ते हिंगोली असा रस्ते मार्गे प्रवास करावा लागत आहे.टाळेबंदीमुळे उपहारगृहे बंद असल्याने असा प्रवास करताना त्यांना दोन वेळेचे जेवण बरोबर घेवूनच प्रवास करावा लागत आहे.परवा हिंगोलीचा दौरा करून मुंबईला परतीचा प्रवास करत असताना त्यांनी थेट शेताच्या बांधावर आपल्या सोबत आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला.
त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे साथ देणारे पती राजूभाऊ गोडसे यांच्यासोबत एका शेतात बसून जेवण करताना वर्षा गायकवाड यांच्या या साधेपणाचा फोटो काही वेळेतच समाज माध्यमात फिरू लागला.लगोलग हा फोटो विविध समाज माध्यमात तुफान व्हायरल झाला. हा फोटो सर्वसमान्य त्यांच्या चाहत्यांसह, त्यांच्या पक्षातील नेत्यांनीही शेअर केला आहे.मंत्रीपदाचा कसलाही बडेजाव न करता आलेल्या संकटाशी सामना करणा-या आणि त्यांच्यातील साधेपणाचे कौतुक समाज माध्यमातून होताना दिसत आहे.