काळजी करू नका,मागेल त्याच्या हाताला काम : मुख्यमंत्र्यांचा दिलासा

मुंबई नगरी टीम

मुंबई: कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु असतांना  कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्याप्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये  रोजगार हमी योजनेची ४६ हजार ५३९ कामे सुरु असून त्यावर  ५ लाख ९२ हजार  ५२५ मजुर उपस्थिती आहे. कोरोनाचा प्रसार मजुरांमध्ये होणार नाही याची दक्षता घेऊन श्रमिकांना काम उपलब्ध करून दिले जात आहे, मागेल त्याला काम देण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत त्यामुळे काळजी करू नका,मागेल त्याच्या हाताला काम नक्की मिळेल असा दिलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,१९ प्रकारच्या कामांसाठी शेल्फवर साधारणत: ५ लाख ८७ हजार ३६० कामे तयार ठेवण्यात आली आहेत. काम उपलब्ध करून देण्यामध्ये तीन विभाग आघाडीवर आहेत यामध्ये  सर्वाधिक कामे ग्रामपंचायत क्षेत्रात उपलब्ध करून देण्यात आली आहेत ती ३६ हजार ०४६ आहेत. कृषी विभागाने ५५२९ कामे तर  रेशिम संचालनालयाने १३२९ कामे उपल्ध करून दिली आहेत.देशात आणि राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या विषाणुचा प्रसार मनरेगाच्या कामांवरील मजुरांना होऊ नये यादृष्टीने मार्गदर्शक सुचनाही निर्गमित करण्यात आल्या आहेत. यामध्ये  मनरेगाच्या कामांची मागणी प्राप्त झाल्यास प्राधान्याने वैयक्तिक स्वरूपाची कामे हाती घेणे, कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, हॅण्डवॉश, सोप, पेपर सोप, उपलब्ध करून देणे, मजुरांना स्थानिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, अंतर ठेवून काम पूर्ण होईल याची काळजी घेणे, यासारख्या सुचनांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यात सर्वाधिक मजुर भंडारा जिल्ह्यात आहेत. तिथे  १ लाख ३१ हजार ११८ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. त्यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर ६२ हजार ८८९ मजुर आहेत. गोंदिया तिसऱ्या स्थानावर असून येथे ५६ हजार १९२ मजुर आहेत.   चंद्रपूरमध्ये  ४९  हजार ७९६, पालघरमध्ये ४४ हजार ६२२, गडचिरोलीमध्ये ३२ हजार ५५१, नंदूरबारमध्ये  २७ हजार १९१, नाशिकमध्ये १९ हजार ५६७, यवतमाळमध्ये१७ हजार १९६, बीडमध्ये १३ हजार १३२, उस्मानाबादमध्ये११ हजार ७७७,जालन्यात ११ हजार ७७४, धुळयात ११ हजार १४६, अहमदनगर मध्ये ९ हजार ९१७, नांदेडमध्ये ८ हजार ५२१, बुलढाण्यात ७  हजार ८७४, लातूरमध्ये ७ हजार ८७२, औरंगाबादमध्ये ७ हजार ०४४, नागपूरमध्ये ६ हजार ९३६, जळगावमध्ये ६ हजार ८८७, हिंगोलीमध्ये ६ हजार ८३५, रत्नागिरी मध्ये ४ हजार ८७७, परभणीमध्ये ४ हजार ३६७, पुण्यात ४ हजार ०१६, अकोला- ३ हजार ६८९, सोलापूरमध्ये ३ हजार ५६९,  वर्ध्यात ३ हजार ४७७, साताऱ्यात  ३ हजार ३५३, सांगलीमध्ये ३ हजार १५६, वाशिमध्ये ३ हजार १३३, सिंधुदूर्ग मध्ये २ हजार ३४३, ठाण्यात  २ हजार १५६, कोल्हापूरमध्ये १ हजार ९८८,रायगडमध्ये १ हजार ५६४ मजुर कामावर उपस्थित आहेत.ही १९ मे ची स्थिती आहे. राज्यात ४ एप्रि ला ३ हजार ३९३ कामांवर  १९५०९ मजुर कामावर उपस्थित होते. २३ एप्रिलपर्यंत यात वाढ होऊन  २३ हजार ०२६ कामांवर १ लाख ४० हजार १९६ मजुर कामावर आले.  १८ मे  रोजी ५२ हजार १८६ कामांवर  ६ लाख ५३ हजार ४५३ होते. म्हणजेच रोजगार हमी योजनेच्या विविध कामातून मजुरांना मोठ्याप्रमाणात काम उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे दिसून येते.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एकल जॉब कार्डधारकांची संख्या  २२ लाख २६ हजार ८७८ इतकी आहे. यात एकल महिलांची संख्या ८००९१२ असून एकल पुरुषांची संख्या १४ लाख २५ हजार ९६६ आहे. एकल जॉबकार्डधारक म्हणजे ज्यांना कुणाचा ही आधार नाही असे लोक. त्यांना कामाच्या माध्यमातून आधार मिळावा म्हणून एकल जॉब कार्डधारकांना प्राधान्याने कामे उपलब्ध करून  देण्याच्या सुचनाही सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

Previous articleकोरोना संकट हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी
Next articleमहाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी मंत्री उदय सामंत यांचे युजीसीला पत्र