मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता ग्रेडिंग देऊन विद्यार्थ्यांना पदवी देण्यात यावी,असे पत्र राज्य शासनाकडून विद्यापीठ अनुदान आयोगास देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.यामुळे लवकरच राज्यातील महाविद्यालयातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्यातील स्थिती पाहता अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सुद्धा रद्द करून विद्यार्थ्यांना ग्रेडिंग देऊन पदवी देण्याची परवानगी देण्यात यावी असे विनंती पत्र राज्यशासनाकडून युजीसी कडे पाठविण्यात आले आहे.या पत्राचे उत्तर आल्या नंतर येत्या दोन दिवसात मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, परीक्षेसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीचे सदस्य, विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या सोबत लवकरच बैठक घेऊन अंतिम सत्राच्या परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल असे सामंत यांनी सांगितले.
बारावीच्या सीईटीच्या परीक्षा घेण्यात येणार असून,त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. त्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल.पदवीसाठी असणारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे.जिल्ह्याच्या स्तरावर होणारी परीक्षा ही तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे.याबद्दल सामाजिक अंतराचे पालन करण्यात येईल. विशेषतः जे विद्यार्थी आपापल्या मूळ रहिवासाच्या ठिकाणी गेले आहेत किंवा ज्यांना निवडलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित राहणे शक्य होणार नसेल याचा विचार करून त्यांना निवडलेले परीक्षा केंद्र बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.टाळेबंदीमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत जाणे शक्य होणार नाही, त्यांची व्यवस्था विभागाकडून करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पदव्युत्तर वैद्यकीय व पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे लिंक सुरु होऊ शकल्या नाहीत तर त्या लिंक पुन्हा सुरू करण्यात येतील. ज्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत अशा विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क त्यांना परत देण्याबाबत अथवा ते शुल्क पुढच्या सत्रात वापरता येईल का, कसे याबद्दल निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल.सर्व निर्णय हे विद्यार्थ्यांच्या हिताचे असतील आणि कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे सामंत यांनी सांगितले.