आमदारकीचा राजीनामा देवून गायब झालेल्या अजित पवारांचा ठावठिकाणा असा शोधला !

मुंबई नगरी टीम

मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी मध्ये मोठी उलथापालत झाली होती.निवडणुका घोषित होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा देत अज्ञातस्थळी धुम ठोकली होती.त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत मोठा भूकंप आला होता.त्यावेळी राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने पोलिस अधिका-याच्या मदतीने अजित पवारांचा कसा शोध घेतला ही रहस्यमय कहाणी ज्येष्ठ राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या ‘चेकमेट : हाऊ दी बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ या पुस्तकात कथन केली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चौकशीसंदर्भात नोटीस बजावली होती.या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले होते.त्यावेळी संपूर्ण राजकारण शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या भोवती फिरत होते.ईडीने चोकशीला न बोलवता शरद पवार यांनी स्वत:हून चौकशीसाठी जाण्याचा निर्णय घेतला होता.पवारांच्या या खेळीमुळे निवडणुकीत कुठेही अस्तित्व न जाणवणा-या राष्ट्रवादीच्या अवतीभोवती राजकारण फिरू लागले होते.राज्यातील कायदा सुव्यवस्था पाहता पवार यांनी ईडीच्या कार्यालयात जावू नये म्हणून पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी पवार यांना विनंती केल्यानंतर शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला.या घटनेमुळे संपूर्ण माध्यमांत पवार यांचाच बोलबाला होता.या घटना घडत असतानाच त्याच संध्याकाळी अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला  आणि त्याच क्षणी केणालाही काही न सांगता त्यांनी अज्ञात स्थळ गाठले.

अजित पवारांच्या या राजीनामा नाट्यामुळे ते प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आले.अजित पवार नाराज,काका पुतण्यात संघर्ष अशा बातम्यांनी वृत्तवाहिन्यांचा पडदा व्यापला गेला होता.अजित पवार नाराज असल्याने अमुक या ठिकाणी, आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या कारखान्यावर अशा बातम्या झळकत होत्या. अजित पवार यांनी राजीनामा का दिला ? ते का नाराज आहेत, याची कोणालाच कल्पना नव्हती.अजित पवार सध्या कुठे आहेत याचा थांगपत्ता कोणालाच लागत नव्हता.या घडामोडीत ते वेगळा राजकीय निर्णय घेतील का ? अशा अनेक चर्चा त्यावेळी सुरू होत्या. अजित पवार कुठे असतील याचा पत्ता शरद पवारांना सुद्धा नव्हता होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते काळजीत होते. ते अजित पवारांचा शोध घेत होते. शेवटी राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने आपल्या जवळच्या एटीएसच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून अजित पवारांचा पत्ता शोधण्याची विनंती केली.

या एटीएसच्या अधिकाऱ्याने एका सॉफ्टवेअरच्या सहाय्याने अजित पवार यांचा शोध घेण्यास सुरूवात केली.अजित पवार यांचा मोबाईल बंद होता.तरीही लपून बसलेले दहशतवादी यांचा शोध घेण्यासाठी ज्या सॉफ्टवेअरचा वापर करतात त्याची मदत घेवून अजित पवार यांचा शोध सुरू झाला.आणि या अधिका-याला यामध्ये यश आले.अजित पवार हे  दक्षिण मुंबईमध्येच असल्याचे  निष्पन्न झाले. पण दक्षिण मुंबईमधील नेमक्या कोणत्या ठिकाणी अजित पवार असतील याचा शोध पुढे सुरू झाला.या सॉफ्टवेअरमुळे अजित पवार हे नेपियन्सी रोडवरील एका निवासस्थानी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार हे याच निवासस्थानी राहत असल्याने अजित पवार त्यांच्या बंधूच्या घरी असावेत असा निरोप या एटीएसच्या अधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्या नेत्याला दिला.या माहितीनंतर तत्कालिन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना बोलावले आणि या दोघांनी श्रीनिवास पवार यांचे निवासस्थान गाठले.अशा प्रकारे  अजित पवार यांचे बेपत्ता नाट्य संपुष्टात आल्याचे या पुस्तकात कथन करण्यात आले आहे.

Previous articleराज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ४१ हजार ६४२ वर पोहचली
Next articleझोपलेले महाविकास आघाडी सरकार आता तरी जागे व्हा