मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील तळीरामांसाठी खुशखबर दिली आहे.मुंबईत आजपासून म्हणजेच शनिवारपासून मद्याची होम डिलिव्हरी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.यापूर्वीची परिस्थिती लक्षात घेता मुंबईतील वाईन शॉप्स सुरू राहणार नसली तरी मुंबईतील ज्या व्यक्तीकडे मद्य परवाना आहे अशांना आजपासून घरपोच मद्य खरेदी करता येणार आहे.
राज्यात तिसरी टाळेबंदी जाहीर करताना मुंबईसह राज्यातील वाईन शॉप्स सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती.या निर्णयानंतर मुंबईसह राज्यातील वाईन शॉप्स समोर मद्य खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र होते.अशी खरेदी करताना सामाजिक अंतराचे कुठलेही पालन होताना दिसत नव्हते.त्यामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणखीन बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती.या निर्णयावर चौफेर टीकास्त्र झाल्यावर तत्कालिन महानगरपालिका आयुक्तांनी हा निर्णय तातडीने मागे घेतला होता. आता आजपासून म्हणजेच शनिवारपासून मुंबईत कंटेन्मेट झोन वगळता इतरत्र घरपोच मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आल्याने मुंबईतील तमाम तळीरामांचा जीव भांड्यात पडला आहे.सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याने मुंबईतील वाईन शॉप्स बंदच राहणार असल्याचे महानगरपालिकेच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.आजपासून घरपोच मद्यविक्री करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेले निर्देश पाळणे बंधनकारक करण्यात आले आहेत.
राज्य शासनाने टाळेबंदीत दिलेल्या इतर परवानग्यांमध्ये कसलेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रात या टाळेबंदीची कठोर अमलबजावणी करण्यात येणार आहे.या आदेशानुसार कंटेन्मेट झोन वगळता अन्यत्र मद्याची घरपोच विक्री करता येणार आहे.राज्यात मद्यविक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर राज्यात एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री दुकानापैकी ५ हजार ९७५ दुकाने सुरू असून,राज्यात १५ मे पासून घरपोच मद्यविक्री सुरू करण्यात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे.ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेतांना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून,आता इच्छुक व्यक्ती संगणक,लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या सर्व अधीक्षक,निरीक्षक,दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने ऑफलाईन पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता शंभर रूपये तर आजीवन परवान्याकरीता १ हजार एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात. तरी मद्यविक्री करणा-या दुकानांसमोर गर्दी न करता मद्यसेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने म्हटले आहे.