मुंबई नगरी टीम
मुंबई : गेल्या पाच वर्षात ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा उद्योग केला,त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक बाजू सांभाळण्यास सक्षम आहोत.त्यांना कर्ज काढण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी कंपनी खोलावी अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदतीवरून केंद्र सरकारला लक्ष केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला कर्ज काढण्याचा सल्ला दिला. या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी खरपूस समाचार घेतला आहे.केंद्राने महाराष्ट्राला २८ हजार कोटी रुपयांची मदत केल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. विविध योजनांसाठी पैसा द्यावा लागतो. ते देणे केंद्राला बंधनकारक असते. केंद्राने दिलेली मदत नवीन योजनेसाठी खर्च करता येत नाही.केंद्राने जाहीर केलेले पॅकेज हे चुकीचे आहे. त्याचा फायदा राज्य सरकारला झालेला नाही.बंधनकारक पैसे सरकारला आणि जनतेला दिले आहेत असे मलिक यांनी सांगितले. महाराष्ट्राने दीड लाख कोटीचे कर्ज काढले पाहिजे असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.सध्याच्या संकटात असल्याने राज्यात सर्व जण कर्ज काढण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांचा उद्योग चांगल्या पद्धतीने चालेल असा टोलाही मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
आम्ही महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करणार नाही असे फडणवीस सांगत आहेत.परंतु महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होवू शकत नाही. तिन्ही पक्ष भक्कमपणे सरकार चालवत आहेत मात्र दिल्लीपासून गल्लीतील भाजपचे नेते राज्य सरकार पडणार असून,आम्ही सरकार स्थापन करणार असल्याचे सांगतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी अफवा पसरवण्याचे उद्योग हे करीत आहेत.राज्यातीस महाविकास आघाडीचे सरकार पुढील पाच वर्षे टिकणार आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकजुटीने काम करीत असल्याने भाजपने कितीही अफवा पसरविल्या तरी राज्यातील सरकार स्थिर राहील असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला.