मोठा निर्णय : अखेर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द

मुंबई नगरी टीम

मुंबई :सध्या राज्यात असलेल्या कोरोनाच्या संकटात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर पास करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता करीअरच्या महत्वाच्या टप्प्यांवर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे ताटकळत ठेवणे योग्य नसल्याने सेमिस्टर परीक्षांमधील गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना पास करण्यात येईल अशी महत्वपूर्ण घोषणा त्यांनी केली.राज्यातील महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी  कुलगुरू यांच्यास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासह अधिका-यांची याबाबत मते जाणून घेतली होती. राज्यातील कोरोनाचे संकट पाहता सध्याच्या परिस्थितीत तातडीने परीक्षा घेणे शक्य नाही असे त्यांनी सांगितले. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याऐवजी आतापर्यंत झालेल्या सेमिस्टरमधील सरासरीच्या आधारावर पास करण्यात येईल असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.कसलाही परिस्थितीत शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही. आपण जास्त मार्क मिळवू शकतो,असे ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे त्यांच्यासाठी योग्य वेळी परिक्षा घेण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.शहरी भागात ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे सध्याच्या कोरोनामुळे धास्तीत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Previous articleएका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील प्रवासासाठी ई-पास आवश्यक
Next article…आणि पंकजा मुंडेंनी रद्द केला बीड दौरा !