मुंबई नगरी टीम
बीड : परवा ३ जून रोजी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी असून,दरवर्षी त्यांचे लाखो चाहते त्यांचे पुण्यस्मरण करण्यासाठी गोपीनाथगडावर येतात.सध्या राज्यात कोरोनाच्या संकटामुळे टाळेबंदी असल्याने सध्या मुंबईत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या साहेबांच्या पुण्यतिथीसाठी रितसर प्रवासाची परवानगी घेवून बीडला निघणार होत्या.मात्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यानी त्यांना विनंती केली आणि पंकजाताईंनी आपला बीड दौरा रद्द केला.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची परवा पुण्यतिथी असून,दरवर्षी गोपीनाथगडावर त्यांचे लाखो चाहते ही पुण्यतिथी साजरी करतात.राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात टाळेबंदी असल्याने माजी मंत्री पंकजा मुंडे या मुंबईत आहेत.साहेबांच्या पुण्यतिथीसाठी जाण्यासाठी त्यांनी रितसर प्रवासाची परवानगीही घेतली.त्या आज म्हणजेच सोमवारी बीडसाठी रवाना होणार होत्या.पनवेल,नवी मुंबई,पुणे,शिक्रापूर,नगर,जामखेड,पाथर्डी,आष्टी,पाटोदा,शिरूर,बीडच्या लोकांनी पंकजा मुंडे यांना फोन करून आम्ही निघतोय असा निरोप दिला.हिकडे पंकजा मुंडे यांचीही निघण्याची तयारी झाली होती.साहेबांच्या पुण्यतिथीसाठी पंकजा मुंडे उपस्थिती राहणार असल्याचे कळताच लॉकडाऊनच्या काळात मुंबई ते बीड या प्रवासात काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज प्रशासकीय पातळीवर घेतला जात होता.लॉकडाऊन लागू होण्याच्या निर्णयानंतर आणि मधल्या काळात झालेल्या बदलानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांना विनंती केली की,आपण ३ जूनच्या कार्यक्रमांसाठी आखलेला बीड-परळीचा प्रवास रद्द करावा.कारण पंकजा मुंडे यांनी जरी लोकांना आवाहन केले असले तरी त्या येणार असल्याने गोपीनाथगडावर स्थानिक व इतर जिल्हयातील लोक मोठ्या संख्येने जमा होतील आणि त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण येईल,नियमांचा भंग होईल सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी यांनी पंकजा मुंडे यांना दौरा रद्द करण्याची विनंती केली. सध्याची परिस्थिती पाहून त्यांनी अखेर आपला बीडचा दौरा रद्द केला.
पंकजा मुंडे या बीडला गेल्या असत्या तर तेथील लोकांनी त्यांचे अनुकरण केले असते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गर्दी केली असती त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असते.मी एक जबाबदार नागरिक,मंत्री राहिलेली आहे.मी प्रशासनाच्या अडचणी समजू शकते,हा विचार करून तसेच लोकांची काळजी म्हणून ३ जून मुंडे साहेबांचे पुण्यस्मरण घरात राहूनच करेन. माझी बहीण खा. प्रीतम ताई ह्या परळी येथेच आहेत,त्यादिवशी त्या गोपीनाथ गडावर जातील आणि दर्शन व माझा कार्यक्रम असे दोन्ही ऑनलाईन करतील असे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे. आपण घरात राहूनच मुंडे साहेबांची पुण्यतिथी साजरी करावी.कशी साजरी करायची याबद्दलचे सर्व डिटेल्स लवकरच देईन आणि आपण सर्व त्याच वेळेमध्ये कार्यक्रम करूया आणि मुंडे साहेबांना समर्पित असा तो दिवस पार पाडूया असेही आवाहनही त्यांनी या माध्यमातून केले आहे.
मुंडे साहेब जरी आज असले असते तरी त्यांनी प्रशासनाचा मान राखला असता.एखादा अनुचित प्रकार झाला असता किंवा दुसऱ्या एखाद्या करण्यासाठी संचारबंदी लागली असती तर त्याची पर्वा मी केली नसती पण इथे लोकांचा जीव आणि त्यांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागत आहे,अगदी मनावर दगड ठेवून..साहेबांचे दर्शन मी तीन जूनला घेऊ शकत नाही हे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी अतिशय अवघड आहे.मी खूप व्यथित आहे.पण तरीही मी प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहे, आपणही सहकार्य करावे आणि कोणीही आपापल्या घरातून बाहेर पडू नये आणि माझ्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी असेही आवाहन त्यांनी केले आहे.