नरेंद्र मोदींचा फोन येताच देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.शिवाय शिंदे सरकार यांच्या सरकार मध्ये आपण सहभागी न होता हे सरकार पूर्ण व्यवस्थित चालले पाहिजे ही जाबाबदारी माझी देखील असेल असे त्यांनी जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीतील केंद्रीय नेत्यांनी फडणवीस यांना शिंदे यांच्या सरकार मध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होण्याचे आदेश दिल्यानंतर फडणवीस यांनी ऐनवेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून थेट राजभवन गाठून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अशी घोषणा करताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.शिंदे सरकारमध्ये मी सहभागी होणार नाही मात्र या सरकारमध्ये भाजपचे मंत्री असतील असे जाहीर केले.फडणवीस यांच्या या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना फोन करून शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा आग्रह धरला तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही फडणवीसांनी उपुमख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे आदेश दिल्यानंतर फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्यास राजी झाले आणि शपथविधी पार पडला.राजभवन येथे केवळ एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याने व्यासपीठावर राज्यपाल आणि शिंदे यांच्यासाठी दोन खुर्चा ठेवण्यात आल्या होत्या.मात्र त्यानंतर अजून एक खुर्ची वाढविण्यात आली.

Previous articleएकनाथ शिंदे ठरले राज्याचे चौथे सातारकर मुख्यमंत्री
Next articleशिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊच शकत नाही,हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही !