शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊच शकत नाही,हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही !

मुंबई नगरी टीम

मुंबई । माझ्यात आणि अमित शाह यांच्यात शिवसेना-भाजपने मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ वाटून घेण्याचे ठरले होते.तसे झाले असते तर आज अडीच वर्षे झाली आहेत.जे काही घडले ते शानदारपणे झाले असते.या जोडगोळीने अशाच पद्धतीने अडीच वर्ष पूर्ण केले असते.मग त्यावेळी नकार देऊन आता भाजपाने असे का केले असा सवाल करतानाच,शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही.हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही,अशी स्पष्टोक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपण आता नियमित शिवसेना भवनात जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे शिवसैनिक तसेच पदाधिका-यांच्या बैठका घेतल्या.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कालच स्थापन झालेल्या शिंदे सरकारबाबत आपली भूमिका मांडताना जनतेत निर्माण झालेला संभ्रम दूर केला.शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही.हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही,असेही त्यांनी ठणकावले.लोकशाहीचे धिंडवडे काढले जात आहेत. मतदारांच्या मताचा बाजार मांडला जात असेल तर ते घातक आहे,असा संताप व्यक्त करताना लोकशाहीचे धिंडवडे थांबवा,अशा शब्दांत त्यांनी भाजपला फटकारले.त्यांच्या मते शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले आहे मग हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो.माझ्यात आणि अमित शाह यांच्यात शिवसेना-भाजपने मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ वाटून घेण्याचे ठरले होते.तसे झाले असते तर आज अडीच वर्षे झाली आहेत. जे काही घडले ते शानदारपणे झाले असते. या जोडगोळीने अशाच पद्धतीने अडीच वर्ष पूर्ण केले असते. मग त्यावेळी नकार देऊन आता भाजपाने असे का केले असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी केला.

शिवसेना तुमच्यासोबत सोबत होती.लोकसभा,विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही एकत्र होतो. निवडणुकीच्या आधी हेच ठरले असताना मग मला कशाला मुख्यमंत्री होण्यास भाग पाडले.तसे घडले असते तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता,असेही ठाकरे यांनी यावेळी भाजपला सुनावत त्यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर अमित शाह यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून दिली.त्यावेळी अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर हे सरकार शानदारपणे आले असते.आता अडीच वर्षाचा काळ पूर्ण झाला आहे.अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचा किंवा भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता.पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला असता तर एक पत्र तयार करून त्यावर मुख्यमंत्र्याची सही,पक्षप्रमुख म्हणून माझी सही केली असते.आज शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असून आमच्यात ठरलेल्या कराराप्रमाणे या दिवशी पायउतार होईल असा मजकूर लिहिला असता.मी तर म्हणालो होतो हे पत्र मंत्रालयाच्या दाराशी होर्डिंग करुन लावा म्हणजे हा करार कोणापासून लपून राहिला नसता असेही ठाकरे म्हणाले.

अशा पद्धतीने माझ्याशी वागले याचे मला दु:ख झाले आहे.माझ्या पाठीत सुरा खुपसला असून, मला दिलेला शब्द पाळला असता तर किमान अडीच वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता.आता पाचही वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री नसणार आहे.यात भाजपाला आणि त्यांच्या मतदाराला काय आनंद आहे माहिती नाही, असा सवालही यावेळी ठाकरे भाजपला केला.यावेळी त्यांनी शिवसेनेच्या पाठीशी राहिलेल्या जनतेचे आभार मानले.गेल्या ८-१० दिवसात मला अनेकांचे मेसेज आले.समाज माध्यमावरून अनेकांनी भावना व्यक्त केल्या.त्याबद्दल मी ऋणी आहे. एखाद्याने पद सोडल्यावर लोक रडतात असे क्वचित होते. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे,असे सांगताना तुमच्या डोळ्यातील अश्रूंशी कधी गद्दारी,हरामखोरपणा करणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिला.अशा पद्धतीने शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला उतरवून स्वत: मुख्यमंत्री होण्याचा जो अट्टहास केला आहे हा आवडला की नाही हे जनतेने ठरवायचे आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही, असेही ठाकरे यांनी ठणकावले.

Previous articleनरेंद्र मोदींचा फोन येताच देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
Next articleशिंदे-फडणवीस सरकार दोन चाकी स्कुटर ; हँडल मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात