मुंबई नगरी टीम
मुंबई : संपूर्ण जगात कोळसा खाणींमध्ये आपल्या देशाचा चौथा क्रमांक लागतो. मात्र तरीदेखील आपण कोळशाची बाहेरून आयात करतो.कोळशाचे वीज निर्मितीतील महत्व अनन्यसाधारण आहे. आपण दर्जेदार कोळशाची उत्पादन क्षमता संपुर्णपणे उपयोगात आणली तर वीज निर्मितीचा प्रश्नही मिटेल आणि संपूर्ण ग्रामीण भागाला अव्याहतपणे परवडणाऱ्या दरात व अखंडित वीज पुरवठा करता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
वेस्टर्न कोलफिल्डच्या वतीने महाराष्ट्रातील नागपूर जवळील आदासा याठिकाणी एक आणि मध्यप्रदेशातील दोन कोळसा खाणींचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ऑनलाईन झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी, यांनी देखील आपले विचार मांडले. भंडारा जिल्हा पालकमंत्री सुनील केदार, इतर लोकप्रतिनिधी तसेच वेस्टर्न कोलफिल्डचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक कळ दाबून ऑनलाईन पद्धतीने या खाणीच्या कामाचा शुभारंभ केला. आदासा खाणीत ३३४ कोटी रुपये गुंतवणूक केली जात असून १.५ दशलक्ष टन कोळसा उत्पादन होणार आहे. ५५० जणांना रोजगार मिळणार आहे.गेल्या दोन तीन महिन्यांपासून आपण सगळे कोरोनाशी लढतोय. आपले जीवनच जणू थांबले आहे की काय असे वाटत असतांना प्रचंड उर्जेचा स्त्रोत देणाऱ्या या कोळसा खाणीचा शुभारंभ आज आपण करतोय यातून खूप चांगला संदेश आपण देत आहात. अन्न , वस्त्र, निवारा या जीवनावश्यक वस्तूंमध्ये आपल्याला उर्जेचाही समावेश करावा लागेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आज स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाली पण आपल्याला खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या विजेविषयीच्या मागण्या आणि अपेक्षा शंभर टक्के पूर्ण झाल्या असे म्हणता येत नाही. अजूनही भारनियमन पूर्णपणे बंद करणे, परवडणाऱ्या दरात ,अखंडित वीज पुरवठा देणे या गोष्टींची पूर्तता आपल्याला करायची आहे. चांगल्या दर्जाच्या कोळशाचे उत्पादन झाले तर वीज निर्मितीच्या अडचणी भविष्यात दूर होतील असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
कोळसा खाणींमुळे होणारे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोळसा खाणींमधून निघणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूचे वातावरण प्रदूषित होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचतो, श्वसन व इतर आजार उद्भवतात. कोळशातील राखेचे प्रमाण कमी करण्यासाठी कोळसा धुण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे झाल्यास प्रमाण खूप कमी होऊ शकते. त्यासाठी वॉशरीज चांगल्या हव्यात. कोळशाच्या खाणी जेव्हा उत्पादन पूर्ण झाल्यावर बंद केल्या जातात तेव्हा त्या तशाच न सोडता त्यावर झाडे फुलवून , त्या जागेवर जंगल तयार केल्यास पर्यावरणाला मदत होईल. कोळसा खाणी बंद करण्याचा कालावधी पण निश्चित केला पाहिजे असेही ते म्हणाले.अनेक वर्षांपासून रखडलेल्या नागपूर-नागभीड ब्रॉडगेज मार्गाचा शुभारंभही लवकरच करण्यात येईल . त्यादृष्टीने आवश्यक ती तयारी राज्य सरकारने केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.येणाऱ्या ४ वर्षांत महाराष्ट्रात १४ खाणी सुरु होत आहेत आणि त्यातील ३ याच वर्षी सुरु करण्याचे आपण ठरविले आहे.या खाणींमुळे ११ हजार ५०० कोटींची गुंतवणूक होईल आणि सुमारे १३ हजार लोकांना रोजगार मिळेल अशी माहिती यावेलो वेस्टर्न कोलफिल्डने दिली.