बाळासाहेब थोरातांना ‘मातोश्री’च्‍या दारात जावे लागणे हीच मोठी शोकांतिका

मुंबई नगरी टीम

अहमदनगर: राज्यातील महाविकास आघाडीतील राष्‍ट्रीय पक्षाच्‍या प्रदेशाध्‍यक्षाला आठ-आठ दिवस मुख्‍यमंत्री भेटीची वेळ मिळत नाही हे दुर्दैव असून, एवढी लाचारी पत्‍करून सत्‍तेत का राहता असा सवाल करतानाच,सत्‍तेत आम्‍हाला स्‍थान राहू द्या यासाठीच आता मातोश्रीवर वाऱ्या सुरू झाल्या आहेत. गांधीं नेहरूंचे विचार सोडून काँग्रेसच्‍या प्रदेशाध्‍यक्षांना ‘मातोश्री’च्‍या दारात जावे लागते हीच मोठी शोकांतिका आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या नाराजी नाट्यावरून अहमदनगर जिल्ह्यातील  विखे-थोरात या दोन नेत्यांमध्ये सध्या वाकयुद्ध सुरू आहे.नाराजीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली होती. या भेटीवरून काँग्रेस एवढी कधीच लाचार नव्हती असा टोला माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी हाणला होता.तर मुख्यमंत्र्यांच्या पाया पडणारा विरोधी पक्षनेता महाराष्ट्राने पाहिला आहे,असे प्रत्युत्तर बाळासाहेब थोरात यांनी दिले होते.आज पुन्हा विखे यांनी थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.काँग्रेसमध्ये  थोरातांचे स्‍थान काय आहे ? मी पक्ष सोडला म्‍हणून त्‍यांना हे पद मिळाले आहे. आता तर मंत्रिपद टि‍कविण्‍यासाठी त्‍यांची धडपड सुरू आहे,’ अशा शब्दांत विखे-पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

कोण कोणाच्‍या पाया पडतो हे पाहणारे थोरात मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍यात काय करायचे ? भ्रष्टाचाराच्‍या फाइली काढू नयेत म्‍हणून मुख्यमंत्र्यांचे पाय दाबायचे की भाजपमध्‍ये घ्‍या म्‍हणून विनवणी करायचे यावरही त्‍यांनी बोलले पाहिजे,असे आव्‍हान विखे यांनी थोरात यांना दिले आहे.सत्‍तेत सहभागी असतानाही राष्‍ट्रीय पक्षाच्‍या प्रदेशाध्‍यक्षाला आठ-आठ दिवस मुख्‍यमंत्री भेटीची वेळ देत नाहीत हे दुर्दैव आहे. सत्‍तेत आम्‍हाला स्‍थान राहू द्या यासाठीच आता मातोश्रीवर वाऱ्या सुरू झाल्या आहेत.गांधी नेहरूंचे विचार सोडून काँग्रेसच्‍या प्रदेशाध्‍यक्षांना ‘मातोश्री’च्‍या दारात जावे लागते हीच मोठी शोकांतिका आहे, असा टोला विखे  यांनी लगावला आहे.भ्रष्‍टाचाराच्‍या फाइली बाहेर येवू नयेत यासाठीच त्यांनी युती सरकारच्‍या विरोधात एक शब्‍दही काढण्‍याची हिंमत दाखवली नाही असा आरोप विखे यांनी केला.

Previous articleजितेंद्र आव्हाडांचा “तो” मास्क चर्चेत ! 
Next articleउद्यापासून भाजपाचे “कर्जमाफी करा,पीक कर्ज द्या” आंदोलन