मुंबई नगरी टीम
मुंबई : ३ जून रोजी राज्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला आहे.या मध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे.अशा नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.निसर्गग्रस्तांना आता वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्यानुसार या आपत्तीत कच्च्या किंवा पक्क्या घरांचे ५० टक्के नुकसान झाले आहे अशांना ५० हजारांची मदत मिळणार आहे.
३ जून रोजी राज्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकणासह काही जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. या मध्ये कोकणातील बागा आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे.अशा नुकसानग्रस्तांना मिळणारी मदत ही तुटपुंजी असल्याने त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्यानुसार नैसर्गिक आपत्तीत कपड्यांच्या नुकसानीसाठी प्रति कुटूंब २५०० हजार रूपये देण्यात येत होते. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून,कपड्यांच्या नुकसानीसाठी प्रति कुटूंब ५ हजार रूपये नुकसान भरपाई म्हणून वाढीव दराने मदत करण्यात येईल.घरगुती भांडी आणि वस्तूंचे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना यापूर्वी २५०० हजार रूपयांची मदत दिली जात होती त्यामध्ये वाढ करण्यात येवून आता अशा नुकसानीसाठी ५ हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे.
पडझड झालेल्या ( किमान १५ टक्के) पक्क्या, कच्च्या घरांसाठी यापुर्वीच्या निकषानुसार प्रति घर ६ हजार रूपये मदत दिली जात होती. आता अशा नुकसान झालेल्या घरांसाठी प्रति घर १५ हजार रूपये मदत दिली जाणार आहे.२५ टक्के नुकसान झालेल्या पक्क्या, कच्च्या घरांसाठी २५ हजार रूपये मदत देण्यात येणार आहे.तर ५० टक्के नुकसान झालेल्या घरांसाठी ५० हजारांची मदत दिली जाणार आहे.वादळामुळे बोटींच्या दुरूस्तीसाठी यापुर्वी ४१०० रूपये मदत करण्यात येत होती आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून आता बोटींच्या दुरूस्तीसाठी १० हजार रूपये मदत केली जाणार आहे.वादळामुळे पुर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी पुर्वी ९६०० रूपये आर्थिक मदत करण्याच येत होती आता त्यामध्ये वाढ करण्यात येवून अशा नुकसान झालेल्या बोटींसाठी २५ हजाराची मदत करण्यात येणार आहे.अंशत: बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरूस्तीसाठी यापुर्वी २१०० रूपये मदत करण्यात येत होती आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. अंशत: बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरूस्तीसाठी ५ हजारांची मदत देण्यात येणार आहे.पुर्णत: नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी यापुर्वी २६०० रूपये मदत केली जात होती आता त्यामध्ये वाढ करण्यात येवून नव्याने ५ हजारांची मदत दिली जाणार आहे.