मुंबई नगरी टीम
महाड : कोकणात फार कमी शेतकरी पिक कर्ज घेतात आणि घेतलेलं कर्ज इमानदारीने फेडतात. ज्यावेळेला दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये हजार हजार कोटी रुपयांची पीक कर्ज माफ होतात त्यावेळेला कोकणात दहा कोटींच्या वर कर्जमाफी जात नाही.म्हणून कोकणातील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासन ५० हजार रुपये देणार असे जाहीर करण्यात आले. परंतु,यातली दिड दमडीही अद्याप मिळाली नसल्याने कोकणातील शेतकऱ्यांच्या वाट्याला निराशा आली आहे.तरी,नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार काय करणार असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यशासनाला विचारला आहे.
राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रत्नागिरी जिल्हाचा दौरा केला.त्यानंतर दरेकर यांनी दापोली येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण व निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा तसेच त्यावरील केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.महाड येथे प्रांत अधिकारी यांच्या समवेत निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीबाबत व शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत दरेकर यांनी चर्चा केली.या प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.पत्रकारांशी संवाद साधताना श्री.दरेकर म्हणाले,कोकणातील शेतकरी हा इमानदार आणि प्रामाणिक शेतकरी आहे.निसर्ग चक्रीवादळ आणि कोविडमुळे ओढवलेल्या संकटामुळे तो आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या बेजार झाला आहे.असे असताना कोकणातील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासन ५० हजार रुपये देणार असे जाहीर करून कोकणातील शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप दरेकर यांनी केला. प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपये इन्सेंटिव्ह म्हणजे प्रोत्साहनपर भत्ता देण्याचे घोषित करून फसवणूक केली.तरी,ही भूमिका मांडल्यानंतर पीक कर्जाच्या संदर्भात इकडे नेमकी काय परिस्थिती आहे?यासंदर्भात पुढे काय ठरलं? शेतकऱ्यांपर्यंत पैसे आले का? शासनाने काय केलं या संदर्भातील तपशीलवार माहिती मागविली असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.