तिजोरीत खडखडाट असतानाही शिक्षणमंत्र्यांसाठी २२ लाखांची कार !

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या तिजोरीत असलेल्या खडखडाटामुळे अनेक विभागांतील कर्मचा-यांना निम्मा पगार देण्याची वेळ राज्य सरकारवर आलेली असतानाही राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी इनोव्हा क्रिस्टा ही २२ लाख ८३ हजार किंमतीची आरामदायी कार खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मार्च महिन्यात राज्यात कोरोनाच्या विषाणूंनी आपले हात पाय पसरायला सुरूवात केल्यानंतर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली.आरोग्य विभाग आणि वैद्यकिय विभाग वगळता अन्य खात्यातील भरती रद्द करण्यात आली.तर पहिल्यात महिन्यात काही विभागांच्या वेतनात कपात करण्याची वेळ राज्य सरकारवर येवून कर्मचा-यांच्या पगारासाठी कर्ज काढण्याची परिस्थिती असतानाच दुसरीकडे शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी राज्यस्तरीय वाहन आढावा समितीने ५ वाहने खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.त्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री वर्षा  गायकवाड,शालेय शिक्षण, क्रीडा राज्यमंत्री ,अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,कार्यालयीन वापराकरिता एक अशी ५ वाहने खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

परंतु सद्यस्थितीत, शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांना कार्यालयीन वापराकरिता शासकीय वाहन उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याने, मंत्री शालेय शिक्षण यांच्या कार्यालयीन वापराकरिता २२ लाख ८३ हजार ८६ रूपये किमतीचे इनोव्हा क्रिस्टा हे वाहन खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.हे वाहन मधुबन मोटर्स कंपनीकडून खरेदी करण्यासाठी विशेष बाब म्हणून शासन मंजूरी देण्यात आली आहे.या वाहनाची किंमत २२.८३ लक्ष म्हणजेच रु.२० लक्षपेक्षा अधिक असल्याने एक विशेष बाब म्हणून वाहन खरेदी करण्यास वित्त विभागाच्या राज्यस्तरीय वाहन आढावा समितीने तसेच मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.असे आज जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात नमुद करण्यात आले आहे.

Previous articleपोलिस अधिकाऱ्यांची विभागीय परीक्षा ऑगस्टमध्ये घेणार
Next articleअभिनेता अक्षय कुमारच्या नाशिक दौऱ्याबाबत  छगन भुजबळ काय म्हणाले !