मुंबई नगरी टीम
मुंबई : पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने या दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या ५ नगरसेवकांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्याने दोन्ही पक्षांत निर्माण झालेला तणाव निवळला आहे.
पारनेर नगरपंचायतीमधील नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे या पाच नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.या प्रवेशामुळे शिवसेनेत नाराजीचे वातावरण होते.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यावरुन नाराज झाल्याची चर्चा होती. तसेच आमचे नगरसेवक परत पाठवा असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना पाठवल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये यावर चर्चा झाल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली.
या घडामोडी नंतर राष्ट्रवादीत गेलेल्या पारनेरच्या पाच नगरसेवकांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे या नगरसेवकांना स्वगृही आणण्यात शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.