मुंबई नगरी टीम
हिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत तर बारावीचा निकाल येत्या १५ ते २० जुलैपर्यंत लागणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
आज आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत माध्यमांशी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे. इयत्ता बारावीचा निकाल येत्या १५ ते २० जुलै तर इयत्ता दहावीचा निकाल येत्या ३१ जुलैपर्यंत लागणार असल्याचे शिक्षण मंत्री गायकवाड यांनी सांगितले.राज्यात कोरोनाच्या संकटामुळे इयत्ता दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला.तर कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या शैक्षणिक वर्षात पेपर तपासणीची प्रकिया लांबणीवर पडल्याने त्याचा परिणाम निकालावर झाला आहे.दहावी आणि बारावीचा निकाल केव्हा जाहीर केला जाणार याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. आज आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.त्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री गायकवाड बोलत होत्या.यावेळी त्यांनी आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.