एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद !

मुंबई नगरी टीम

मुंबई : सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीवरून भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे.सध्या शिवसेनेकडे मुलाखत घ्यायला माणसंच नाहीत, पण किमान ज्यांची मुलाखत घेतली ते अनुभवी तरी आहेत.आधी ज्यांची मुलाखत घ्यायचे ते सगळे वाचून बसायचे,एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद अशी त्यांची स्थिती आहे.असा टोला  राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घेतलेली मुलाखत उद्या शनिवारपासून तीन भागात प्रसारीत केली जाणार आहे. एक शरद..सगळे गारद या शीर्षक असलेला काही भाग खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून प्रसिद्ध केला आहे. या मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच या मुलाखतीवरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष केल्यानंतर भाजपचे खासदार नारायण राणे यांनीही शिवसेनेचा समाचार घेतला आहे. सध्या शिवसेनेकडे मुलाखत घ्यायला माणसंच नाहीत, असे दिसते  पण राऊत यांनी ज्यांची मुलाखत घेतली, ते अनुभवी तरी आहेत.मात्र आधी ज्यांची  मुलाखत घ्यायचे ते सगळे वाचून बसायचे,एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद अशी त्यांची स्थिती आहे. असा टोला राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे.त्यांनी यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.राज्यात शिवसेनेची सत्ता असूनही मंत्री आणि नेते यांचेच ऐकले जात नाही.सध्या महाविकास आघाडीत धुसफूस सुरु असून, शिवसैनिकानाच कोणी विचारत नाहीत अशी स्थिती आहे असेही राणे यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या सणांमध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.कोकणी माणसांसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे.चाकरमान्यांचा परिवार गावी असतो,गणपती हे आमचे आराध्य दैवत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली,तर आम्ही आंदोलन करु असा इशारा देतानाच, त्यांना कोणत्याही पासची सक्ती करु नये अशीही मागणी त्यांनी केली. कोरोनापासून बचावासाठी प्रत्येक जण आपली काळजी घेईल असेही  राणे म्हणाले.

Previous article“या” तारखेला लागणार दहावी आणि बारावीचा निकाल !
Next articleमहाविकास आघाडीच्या काळात दलित आणि बौद्धांवरील अत्याचारात वाढ