परीक्षा रद्दच करा : प्राध्यापक संघटना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतांच्या पाठीशी

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून घेतलेल्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला  विद्यार्थी आणि पालकांनी दिलेल्या पाठिंब्यानंतर आता राज्यातील प्राध्यापक संघटनाही मंत्री सामंत यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्‍‌र्हसिटी अ‍ॅण्ड कॉलेज टिचर्स ऑर्गनायझेशन (एमफुक्टो)ने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आणि विद्यार्थी हिताचा असल्याचे सांगत हा निर्णय कायम ठेवावा आणि त्यासाठीचे आदेश विद्यापीठांना द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे.सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता या निर्णयाला राज्यातील विद्यार्थी आणि पालकांनी सरकारच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्‍‌र्हसिटी अ‍ॅण्ड कॉलेज टिचर्स ऑर्गनायझेशन (एमफुक्टो)ने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना  एक पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आणि विद्यार्थी हिताचा असल्याचे सांगत हा निर्णय कायम ठेवावा आणि त्यासाठीचे आदेश विद्यापीठांना द्यावेत अशी मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युजीसीने मे मधील केलेल्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाने शेवटच्या वर्षाखेरीज इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून, त्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्याची मुभा देऊन दिलासा दिला होता. व शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा जुलैमध्ये घेतल्या जातील व त्याची घोषणा जूनमध्ये केली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार जूनमध्ये महाराष्ट्र शासनाने तत्कालिन गंभीर परिस्थितीचा विचार करून शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून, त्यांना त्यांच्या मागील सरासरीने गुण देणे किंवा पुढील काळात होणाऱ्या परिक्षेत सहभागी होणे, हा विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचारी यांच्या हिताचा निर्णय जाहीर केला होता.

काही दिवसांपूर्वी युजीसीने शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन,ऑनलाईन,किंवा संयुक्त पद्धतीने सप्टेंबर अखेर घ्याव्यात अशी शिफारस केली आहे. मात्र ही शिफारस विद्यार्थ्यांच्या हिताची नसून त्यांच्या जिवाला धोका निर्माण करणारी आहे,यामुळे सरकारने अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात १९ जून रोजी जाहीर केलेला विद्यार्थी हिताचा निर्णयच कायम ठेवून सर्व विद्यापिठांना तसा आदेश द्यावा, अशी मागणी एमफुक्टोचे महासचिव प्रा डॉ एस पी लवांदे व अध्यक्षा प्रा डॉ तपती मुखोपाध्याय आणि उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब साळवे यांनी केली आहे. सरकारने परीक्षा न घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्या निर्णयाला  महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचा पूर्ण पाठिंबा आहे. सरकारने  जो निर्णय घेतला आहे, तो विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे हित लक्षात घेतले आहे. यामुळेच आम्ही सर्व विचार करून सरकारला पाठिंबा दिला असून सरकारने परीक्षा न घेण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहावे अशी मागणीही डॉ. साळवे यांनी केली आहे.

Previous article१४० नंबर वरून येणा-या फोन कॉल संदर्भात सायबर विभागाने केला मोठा खुलासा
Next articleप्रविण दरेकर यांचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना सडेतोड प्रत्युत्तर