राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी भाजप नेत्यांनी ५०० कोटी रूपये जमवले!

मुंबई नगरी टीम

मुंबई : राजस्थानातील आमदारांना विकत घेऊन काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमवले आहेत.असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की,केंद्रातील भाजपचे सरकार सत्ता पैसा आणि सीबीआय,ईडी,इन्कम टॅक्स यांचा वापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे.महाराष्ट्रातील भाजप नेते यासाठी वापरले जात आहेत. कर्नाटकातील काँग्रेस जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा वापर केला गेला आहे. कर्नाटकच्या आमदारांना भाजप सरकारच्या काळात मुंबईच्या हॉटेलात पोलिस बंदोबस्तात डांबून ठेवले होते. महाराष्ट्रातील भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याच्या घरी यासंदर्भातल्या बैठका होत होत्या,हे राज्यातील जनतेने पाहिले आहे. आताही महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमा करून राजस्थान सरकार पाडण्यासाठी पाठविले आहेत अशी खात्रीशीर माहिती आपल्याला मिळाली असून आपण यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे. गृहमंत्री महोदयांनाही याबाबतीत त्यांच्या विभागाकडून माहिती मिळाली आहे. राजस्थान सरकारच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने केलेली कारवाई आणि मिळालेल्या ऑडिओ टेप्स मध्ये भाजप कडून मोठ्या प्रमाणात घोडेबाजार केला जात आहे, याला दुजोरा मिळत आहे. या गंभीर प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालावे अशी विनंती आपण त्यांना केली आहे व त्यांनी ती मान्य केली आहे, असे सांगून लोकशाहीत असे अघोरी प्रकार करणा-यांचे महाराष्ट्र भाजपातील मास्टमाईंड शोधले पाहिजेत अशी मागणी सावंत यांनी केली.

Previous articleदुर्घटनाग्रस्त  इमारतीतील बेघर रहिवाश्यांचे तातडीने पुनर्वसन करा
Next articleबकरी ईदच्या दिवशी घरीच नमाज अदा करा; गृहविभागाच्या सूचना जारी