मुंबई नगरी टीम
मुंबई : सध्याच्या कोरोना संकटात रूग्णांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी राज्यातील अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे.या कामातून वगळण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती या संघटनेने केली होती. त्यानुसार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी राज्यातील अंगणवाडी सेविकांना दिलासा देत कोरोना सर्वेक्षणाच्या कामातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.तसे निर्देश त्यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांना दिले आहेत.
राज्यात मार्चपासून कोरोनाच्या प्रादुर्भावास सुरुवात झाल्यापासून राज्यातील नागरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील अंगणवाडी सेविकांना कोरोनाच्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी अद्यापपर्यंत ही जबाबदारी पार पाडली आहे.कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या कामामुळे अंगणवाडी सेविकांच्या मूळ कामावर परिणाम होत आहे. शून्य ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे वजन, उंची घेऊन त्यांचे वाढीचे सनियंत्रण करणे, त्या माध्यमातून कुपोषण लक्षात येत असल्यामुळे वेळीच पोषण आहार आणि इतर उपाययोजनांद्वारे त्यावर मात करणे शक्य होते.बालके,गरोदर महिला,स्तनदा माता या संवेदनशील घटकांसाठी अंगणवाडी सेविका काम करत असल्याने कुपोषण, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होते.परंतु कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या जबाबदारीमुळे या कामावर परिणाम होत होता. तसेच या सर्वेक्षणदरम्यान दुर्दैवाने अंगणवाडी सेविकेस कोविडचा संसर्ग झाल्यास तिच्यापासून शून्य ते ६ वर्षे वयोगटातील बालके,गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांनाही कोविड संसर्गाचा धोका उद्भवू शकत होता.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने नुकतेच विविध मागण्यांच्या अनुषंगाने महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांची भेट घेऊन या कामातून वगळण्याची मागणी केली होती. त्यानुसार ठाकूर यांनी एकात्मिक बाल विकास योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांना लेखी सूचना दिल्या आहेत.अंगणवाडी सेविकांना कोरोना सर्वेक्षण कामातून वगळावे असे निर्देश ठाकूर यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांना दिले आहेत.अंगणवाडी कार्यक्षेत्रातील ६ वर्षे वयापर्यंतची बालके,गरोदर स्त्रिया,स्तनदा माता यांच्याशी संबंधित सर्वेक्षणाचे काम अंगणवाडी सेविकांना देण्यात यावे; जेणेकरून लहान बालकांचे ग्रोथ मॉनिटरिंग आणि या गटातील बालके आणि गरोदर स्त्रिया,स्तनदा माता यांच्यातील कोविड सर्वेक्षणाचे काम करता येईल याप्रमाणे नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनाला कळविण्यात आले आहे.