मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रीया केंद्रीयभूत ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून दिनांक १ ऑगस्टपासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत,अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.तथापी,आयटीआय महाविद्यालये कधी सुरु होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमास अनुसरुन नंतर माहिती जाहीर करण्यात येईल, सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु करीत आहोत,असे त्यांनी सांगितले.
प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छूक विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत आयटीआयसाठी अर्ज करावा. राज्यातील प्रत्येक युवकास कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर रोजगार देण्याचा शासनाचा निर्धार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीही विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नाऊमेद न होता शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन राज्यमंत्री देसाई यांनी केले आहे.
राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय आयटीआय आहे. ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९२ हजार ५५६ इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था,अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात ५६९ खाजगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ५३ हजार २७२ आहे. शासकीय आणि खाजगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ८२८ विद्यार्थी इतकी आहे.
अमरावती – ९० संस्था आणि १७ हजार ९८४ प्रवेशक्षमता, औरंगाबाद – १३३ संस्था आणि १९ हजार २६४ प्रवेशक्षमता, मुंबई – १०८ संस्था आणि २० हजार १२४ प्रवेशक्षमता, नागपूर – २४१ संस्था आणि २८ हजार १३६ प्रवेशक्षमता, नाशिक- २१८ संस्था आणि २९ हजार ५०० प्रवेशक्षमता, पुणे – १९६ संस्था आणि ३० हजार ८२० प्रवेशक्षमता आहे.आयटीआय प्रवेशासंबंधीत नियम, प्रवेशासाठी उपलब्ध जागा, आवश्यक दस्तऐवजांची माहिती व संपूर्ण प्रवेश कार्यपध्दती, याबाबत विस्तृत माहिती समाविष्ट असलेली माहिती पुस्तिका, प्रवेशाचे वेळापत्रक, शासकीय आयटीआय मधील वसतीगृहांची उपलब्धता, मागील तीन वर्षात प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांना व्यवसाय अभ्यासक्रम व संस्थानिहाय इयत्ता दहावीमध्ये प्राप्त झालेले प्रवर्गनिहाय महत्तम व किमान गुण, दिव्यांग विद्यार्थ्यांची व्यवसाय अभ्यासक्रम निहाय पात्रता, जिल्हानिहाय कौशल्याचा अभाव दर्शविणारा अहवाल व्यवसाय प्रशिक्षण पुतिपुर्ती योजनेची माहिती व कार्यपध्दती इत्यादींबाबतची माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, प्रवेश नियमावली काळजीपुर्वक वाचून प्रवेशासाठी अर्ज करावा.
इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येते. तसेच इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येते.