मुंबई नगरी टीम
मुंबई : दुकाने व कार्यालयाचे फलक मराठी भाषेतून आहेत का याची तपासणी करण्यात येवून, दहा पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांवर व कार्यालयावर मराठीत फलक नसतील तर त्यांना कारवाईतून मिळणारी सूट बंद करण्यासाठी नियमात बदल करण्याच्या सूचना राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित विभागांना दिले.
उद्योग,उर्जा,विधी व न्याय आदी विभागांतील शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यातील त्रुटी तत्काळ दूर करा, असे निर्देश देसाई यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.उर्जा विभागातील महावितरणच्या तक्रार निवारण कक्षामध्ये मराठी भाषेतून कामकाज करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मराठी भाषेच्यासंदर्भात देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालायत संबंधित विभागाची बैठक घेण्यात आली.उद्योग विभागातंर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीसोबत मराठी भाषेत असलेच पाहिजे, कामगार विभागाने दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेतून आहेत का याची तपासणी करावी. विशेषतः दहा पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांवर व आस्थापनांवर मराठीत पाट्या नसतील तर त्यांना कारवाईतून मिळणारी सूट बंद करण्यासाठी नियमात बदल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,राज्यात कायदे तयार होताना त्याचा मूळ मसुदा इंग्रजीत तयार होतो तो मसुदा मुळातून मराठी भाषेत तयार करणे शक्य आहे का,याचीही तपासणी करण्याचे निर्देश देसाई यांनी दिले.जिल्हा सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय व लघु न्यायालयात मराठीचा वापर कोणत्या स्तरावर केला जातो,याची सांखिकी माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश विधी व न्याय विभागाला देण्यात आले आहेत. ज्यामुळे मराठीचा वापर वाढविण्याकरिता अडचणी असल्यास त्या दूर करणे शक्य होईल, असेही देसाई म्हणाले.