मुंबई नगरी टीम
मुंबई : लॉकडाउनमुळे गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ धार्मिक स्थळे बंद आहेत. मंदिरे पुन्हा सुरू करण्यात यावीत या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबकेश्वरच्या पुजा-यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवास्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी मंदिरे सुरू करण्याबाबत राज ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवली. मात्र त्यासोबतच काही समस्यांवर देखील प्रश्न उपस्थित केले.
“मंदिरे खुली झाली पाहिजेत. मॉल सुरू होतात, मग मंदिरे का सुरू होत नाहीत. राज्य सरकारला यावर नियमावली द्यावी लागेल. शासकीय नियमांचे पालन होऊनच मंदिरे खुली व्हावीत. मात्र, भाविकांची एकदम झुंबड झाली तर काय कराल?गर्दी कशी रोखाल? गर्दीवर नियंत्रण कसे आणाल?”, असे सवाल राज ठाकरे यांनी पुजा-यांना विचारले. शिवाय मंदिरे खुली केल्यानंतर इतर धर्मीय सर्व नियम पाळतील का?, अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केली आहे. मात्र आपण सर्व सुचना आणि नियमांचे पालन करू, अशी ग्वाही पुजा-यांनी दिली आहे.
कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये, यासाठी शाळा, महाविद्यालयांसह धार्मिक स्थळेही बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु मंदिरातील पुजा-यांसह परिसरातील छोट्या व्यावसायिकांवर देखील आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे मंदिरे खुली करण्यात यावीत या मागणी करता पुजा-यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. दरम्यान, गेल्या आठवड्यातच जिम सुरू करण्याच्या मुद्द्यावर जिम चालकांनी राज यांची भेट घेतली होती. त्यावर जिम सुरू करा, पुढे होईल ते बघू, असे राज यांनी म्हटले होते. त्यानंतर काही दिवसांतच राज्य सरकारकडून जिम उघडण्याबाबत अनुकुलता दाखवण्यात आली. त्यामुळे आता धार्मिक स्थळे उघडण्याबाबत सरकार केव्हा आणि कोणती भूमिका घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.