मुंबई नगरी टीम
पुणे : ठाण्यातील मनसे आणि शिवसेना यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. ठाण्यातील मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर शिवसेनेच्या महिला पदाधिका-यांनी टिप्पणी केल्यानंतर आता मनसे महिला सेनाही आक्रमक झाली आहे.दम असेल तर सत्तेचा वापर न करता समोरासमोर या असा इशारा मनसेच्या महिला पुणे शहराध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे. फेसबूकवरून आपला एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी हा आक्रमक इशारा दिला आहे.
“नुकतीच ठाण्यामध्ये तुम्ही शिवसेनेच्या नेत्यांची जुगलबंदी पाहत आहात. वास्तविक पाहता हा वाद अविनाश जाधव यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यापासून सुरू झाला.त्यानंतर ज्यांनी आम्हाला त्रास दिला, आमची वेळ आल्यावर आम्ही त्यांना घरातून उचलून आणु, असे अविनाश जाधव म्हणाले. मग शिवसेनेच्या नेत्यांना हे टोचण्याचे कारणच काय?”, असा सवाल रुपाली यांनी केला. ज्या ठाण्यात 250 नर्सेसवर अत्याचार होतो तेव्हा शिवसेना गप्प बसते. त्या महिलांना न्याय देण्यासाठी अविनाश जाधव झटत असेल तर त्यांच्यावर खोटे गुन्हा दाखल केले जातात. मला शिवसेनेच्या नेत्यांना विचारायचे आहे की, जेव्हा तुमच्या प्रमुख नेत्याला इंग्रजी पत्रकार घाणेरड्या भाषेत बोलले तेव्हा तुमचा स्वाभिमान कुठे गेला होता. तेव्हा तुमचा अभिमान कोठे होता. परंतु अविनाश जाधव हे बोललेच नाहीत की, कुठल्या शिवसेनेला उचलून आणू. या वक्तव्याचा विपर्यास करून तुम्ही सगळे बोलत असाल तर एक लक्षात ठेवा आम्ही सुद्ध मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कार्यकर्ते आणि मावळे आहोत. जर तुम्ही कुबड्याची भाषा करत असाल तर कुबड्या खेळायला आम्ही सुद्धा तयार आहोत. आमच्यातला दम समोरासमोर नक्कीच दाखवू, आम्हाला पोकळ धमक्या द्यायच्या नाहीत. परंतु शिवसेनेच्या नेत्यांनी, पालक मंत्र्यानी सत्तेचा गैरवापर करू नये. कोण कोणाच्या मांडीवर बसून खेळतं हे परिक्षण निरिक्षण तुम्ही करा. आम्ही खेळतो, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांचे कार्यकर्ते समोरासमोर लोकांचे काम करण्यासाठी खेळतो. तुमच्यात दम असेल तर सत्तेचा वापर न करता समोरासमोर या. मग मला त्यांच्या महिला सेनेला सांगायचे आहे कबड्डी खेळायची की कुबड्या खेळायच्या आम्ही तयार आहोत. पण वातावरण बिघडू नये ही जबाबदारी सत्तेत असणा-या शिवसैनिकांची आहे आमची नाही, असा इशारा रुपाली यांनी दिला आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी अविनाश जाधव यांना तडीपारची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ठाणे मनपासमोर नर्सेसच्या मागण्यांबाबत आंदोलन सुरू असताना खंडणी पथकाने त्यांना अटक केली होती. काही दिवसांनी अविनाश जाधव यांची सुटका देखील झाली. त्यानंतर आम्ही त्यांना एक दिवस घरातून अशाच प्रकारे उचलून नेऊ, असे जाधव यांनी म्हटले होते. यावर शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी एका व्हिडिओद्वारे अविनाश जाधव यांच्यावर निशाणा साधला होता. तेव्हापासून हा वाद आणखी वाढला आहे. दरम्यान हा वाद लवकर शमेल अशी चिन्हे अद्याप तरी दिसत नाही.