मुंबई नगरी टीम
आझमगड : आझमगड येथील बांसा गावात हत्या झालेल्या दलित सरपंचाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखत त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारानंतर नितीन राऊत आणि त्यांच्या समर्थकांनी तिथेच रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. काँग्रेसने ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.
“उत्तर प्रदेश सरकार दलित सरपंच सत्यमेव जयचे यांच्या हत्येला तर रोखू शकली नाही. मात्र आता त्यांच्या घरी पोहोचणा-या भावनांचा संदेश रोखत आहे”, असं म्हणत काँग्रेसने पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. तसेच स्वतः नितीन राऊत यांनी देखील ट्वीट करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. “इथल्या प्रशासनाने अद्यापही गुन्हेगारांना पकडेलेले नाही. तसेच पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारची मदत जिल्हा प्रशासनाने देऊ केलेली नाही. त्यामुळेच मी इथे आलो होतो. परंतु इथली सरकार काँग्रेसला पुर्णपणे घाबरलेली आहे. काँग्रेसच्या कोणत्याच कार्यकर्त्याला गावात जाऊ देत नाही. त्यामुळे आम्हाला त्यांनी इथे थांबून ठेवले असून आम्ही आंदोलन करण्यासाठी बसलो आहोत”, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशमधील आझमगड येथील बांसा गावातील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली. या विभागाचे अध्यक्ष आणि उर्जा मंत्री नितीन राऊत पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांना गावात जाण्यास मनाई करत रोखण्यात आले. दरम्यान, या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.