मुंबई नगरी टीम
मुंबई : फोनद्वारे कोरोनाची जनजागृती करणारी कॉलर ट्यून आता मनसेला नकोशी झाली आहे. ही कॉलर ट्यून त्वरित बंद करा, अशी मागणी माजी आमदार आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. या संदर्भातील ट्वीट करत त्यांनी ही मागणी केली आहे.
कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. पंरतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो. अथवा लागत नाही. त्यामुळे जी काही जनजागृती करायची आहे ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रसार हा दिवसेंदिवस वाढत आहे. सतर्कता बाळगा, गर्दी करू नका असे आवाहन वारंवार शासनाकडून केले जात आहे. मात्र तरीही अनेकांना याचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. या करता सरकारकडून विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. पंरतु मनसेने यावर आक्षेप घेत कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी केली आहे.