भाजप इतका दांभिक कसा ? चंद्रकांत पाटलांना काँग्रेसचा सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई : उत्तर प्रदेशातील आझमगड येथे दलित सरपंचाच्या हत्येप्रकरणी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत हे पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी गेले होते.परंतु नितीन राऊत यांना आझमगड येथे रोखून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर नितीन राऊत यांनी तेथेच ठिय्या आंदोलन केले होते.यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. यावर आता काँग्रेसने प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटील दादा भाजप इतका दांभिक कसा? असा सवाल उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ता सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ वर्षांत अर्धा काळ प्रचार मंत्री म्हणून देशातील प्रत्येक राज्यात प्रचार करत होते आणि त्याच वेळी देश आर्थिक डबघाईस जात होता. देशाला नोटबंदीच्या संकटात टाकून १२५ कोटी लोक रांगेत मेल्यानंतरही विदेश दौऱ्याला गेले. ट्रम्पला नमस्ते करण्यासाठी व मध्य प्रदेशचे काँग्रेस सरकार पाडण्यासाठी लॉकडाउनची घोषणा पुढे ढकलून देशाला कोरोनाच्या संकटात ढकलले. आणि तुम्ही नितीन राऊत यांच्या उत्तर प्रदेश यात्रेला आक्षेप घेता आश्चर्य आहे!

गेल्या सहा वर्षांत देशात दलितांवर हल्ले वाढले. दलित समाजाचे देशात आंदोलन झाले पण मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडेंना पाठीशी घालणाऱ्या तुम्हाला आता दलित समाज आठवला? आश्चर्य आहे! ज्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रात पूर आला त्यावेळी महाजनादेश यात्रा काढणा-यांनी आणि पूरग्रस्तांना वा-यावर सोडून दिल्याने संतप्त झालेल्या पूरग्रस्तांनी जाब विचारला तेव्हा त्यांना अरेरावी करून गप्प बसवणा-यांनी आता उपदेश द्यावा, हे आश्चर्य आहे! देश कोरोनाच्या संकटातून जात असतानाही बिहारमध्ये प्रचार भाजपने इतरांना उपदेश द्यावा, आश्चर्य आहे!”असे सांवत यांनी म्हटले आहे.

Previous articleगणराया…जनतेवर आलेले कोरोनाचे विघ्न दूर कर!
Next articleउत्सव असला तरी ही आपली कसोटी : मुख्यमंत्री ठाकरे