मुंबई नगरी टीम
पंढरपूर : पंढरपूरातील विठ्ठल मंदिर पुन्हा सुरू करण्याच्या मागणीवरून आता वारकरी संप्रदायाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. टाळेबंदीमुळे गेल्या साडे पाच महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करा, अन्यथा येत्या ३१ ऑगस्ट रोजी एक लाख वारक-यांसह आंदोलन करणार, असा इशारा विश्व वारकरी सेनेने दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात वारकरी संप्रदाय आंदोलन करणार आहे.
विठ्ठल मंदिर पुन्हा सुरू करा, या मागणीवरून वारकरी आक्रमक झाले आहेत.त्यामुळे आपली ही मागणी सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी वारक-यांनी शिवसेना,भाजप नव्हे तर थेट वंचितचा पाठिंबा घेतला आहे. यासंदर्भात २४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी, विश्व वारकरी सेना व वंचित पदाधिका-यांसोबत बैठक पार पडणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. परंतु या बैठकीत सकारात्मक तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याची तयारी वारकरी संप्रदायाची आहे.
दरम्यान, टाळेबंदीमुळे राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुनःश्च हरी ओम असा नारा देत टाळेबंदी हळूहळू उठवत असल्याचे सांगितले. मात्र आता पाच महिने होत आले तरीही राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. लाखोंचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूरातील विठ्ठल मंदिर आता खुले करण्यात यावे यासाठी वारक-यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सध्या पंढरपूरात देखील दोन हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आहेत.