पृथ्वीराज चव्हाण,मिलिंद देवरांना राज्यात फिरू देणार नाही;काँग्रेसच्या मंत्र्याने दिला इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई : काँग्रेसच्या राजकीय भवितव्याचा विचार करता पक्षात नेतृत्वबदलाची मागणी जोर धरू लागली आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुक्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी खासदार मिलिंद देवरा, मुकुल वासनिकसह अन्य २३ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना पक्षाच्या पुनर्चनेबाबत पत्र पाठवले आहे.परंतु या मुद्द्यावरुन आता काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण झालेली पाहायला मिळत आहे.त्यामुळे नेतृत्व बदलाची मागणी करणा-या या नेत्यांना काँग्रेस नेत्याकडूनच घरचा आहेर मिळाला आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवणा-या नेत्यांवर निशाणा साधला आहे. सुनिल केदार यांनी अगदी कडवट शब्दांत या नेत्यांवर टीका केली असून त्यांनी थेट इशारा दिला “काँग्रेस अध्यक्ष सोनिया गाधी यांना माझा मनापासून पाठिंबा आहे. मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांनी गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे हे लज्जास्पद आहे. नेत्यांनी केलेल्या या कृत्याबद्दल माफी मागावी.अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते या नेत्यांना राज्यात मुक्तपणे फिरु देणार नाहीत. जर पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडे असेल तर भाजपविरोधात लढता येईल. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वामागे भक्कमपणे उभे राहण्याची हीच ती वेळ आहे”, असे सुनिल केदार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरुन काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाल्याचे चित्र आहे. एक गट ज्यांना पक्ष नेतृत्वात बदलाची अपेक्षा आहे. तर दुस-या गटात गांधी कुटुंबाशी निष्ठावान असणा-या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता काँग्रेस आपली कात टाकून पक्षाच्या पुनर्चनेचा विचार करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleअनुकंपा तत्वावर वायरमन पदाच्या नोकरीसाठी ५६९ तरुणांना आयटीआयमधून प्रशिक्षण
Next articleबिहारमध्ये विकास नाही,कामधंदा नाही ;रोहित पवारांचा निशाणा