बिहारमध्ये विकास नाही,कामधंदा नाही ;रोहित पवारांचा निशाणा  

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लागू केलेले टाळेबंदीचे नियम टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत.त्यामुळे आपापल्या राज्यांत परतलेले परप्रांतीय कामगार महाराष्ट्रात पुन्हा वापसी करू लागले आहेत. या मुद्द्यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बिहार सरकारवर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये विकास नाही,कामधंदा नाही त्यामुळे तिथल्या अनेक लोकांना महाराष्ट्रासारख्या राज्यात जाण्याची वेळ येते,अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे.

महाराष्ट्रात गच्च भरुन येणाऱ्या विशेष ट्रेन पाहिल्या तर लॉकडाउनच्या काळात स्वगृही गेलेले स्थलांतरित कामगार, मजूर यांनी पुन्हा महाराष्ट्रासारख्या विकसित राज्याची वाट धरल्याचे लक्षात येते. वास्तविक लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्राने त्यांना त्या वेळीही प्रेम दिले होते आणि आजही त्यांच्याप्रती सहानुभूतीच आहे. पण मोठ्या आशेने आपल्या मूळ गावी गेल्यानंतर शेवटी त्यांची भ्रमनिराशाच झाली, असे म्हणावे लागेल. मी आज जाणीवपूर्वक या विषयावर लिहितोय की, बिहारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विकास हा नावापुरताही कुठे दिसला नाही. बिहार सरकारने विकासाचे राजकारण करण्याऐवजी केवळ लोकांची दिशाभूल करण्याचेच काम केले. ‘आधीच्या सरकारने केले नाही म्हणून आमच्याकडे हॉस्पिटल नाहीत’, असे एक वक्तव्य कोविड-१९ च्या काळात बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी केल्याचे मी वर्तमानपत्रात वाचले. एक सत्ताधारी मंत्री असे बोलतोय हाच एक मोठा विनोद आहे आणि अशा राजकीय वक्तव्यातूनच त्यांची विकासाची ‘दृष्टी’ दिसून येते.

बिहारमध्ये विकास झाला नाही, कामधंदा नाही,उद्योगधंदे नाहीत,म्हणून आम्हाला महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात जाण्याची वेळ आल्याचे बिहारमधील अनेक लोक मला सांगतात. गेल्या काही दिवसांपासून मी बिहारमधील नेत्यांचे राजकारण पाहतोय पण ते काही विकासाच्या दिशेने सुरू आहे, असं वाटत नाही. एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्यासाठी त्यांच्याकडून जी ताकद खर्च होते त्यातील काही टक्के जरी ताकद आणि वेळ विकासावर खर्च केला असता तर आज बिहारमधील युवांना उपजीविकेसाठी महाराष्ट्रासारख्या अन्य राज्यात जावे लागले नसते. तसेच विकसित भारताचे स्वप्नही साकार झाले असते. विकसित भारत म्हणजे केवळ महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, पंजाब अशा मोजक्याच राज्यांचा विकास नसतो. तर प्रत्येक राज्याने त्यात आपले योगदान देणे गरजेचे आहे. स्पर्धा ही विकासाची व्हायला हवी. पण महाराष्ट्रासारखी काही राज्ये विकासाचे नवनवीन प्रकल्प राबवत असताना बिहार मात्र त्यापासून कोसो मैल लांब आहे. तिथल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत वर्तमानपत्रात अनेक रकानेच्या रकाने भरुन बातम्या मी वाचल्या आणि इथलेच राजकारणी इतर राज्यातील पोलीस यंत्रणेबाबत जेंव्हा बोलतात तेव्हा हसू येते. बिहारी लोक खासकरून युवक हे कष्टाळू आणि चिवट आहेत. त्यांच्यात हुशारीही आहे, पण तरीही विकास का होत नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात युवा शक्तीची ताकद करपून जातेय. म्हणून माझे बिहारच्या युवांनाही आवाहन आहे की, ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनीच आता स्वतःहून पुढे यावे. तुमचा भविष्यकाळ तुम्हीच बदलू शकता, पण तुम्हीही फक्त पाहात बसलात तर काही नेत्यांच्या फक्त सत्तेच्या राजकारणात तुमच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न कधी साकार होईल, हे कोणताही भविष्यकार सांगू शकणार नाही.

राजकारण हे लोकांच्या कल्याणासाठी करायचं असते, पण बिहारमधील राजकारणी मंडळी कशाचे राजकारण करतात हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. पण त्यांच्या या राजकारणामुळे जनता मात्र आहे त्या ठिकाणीच राहिली. लोकांच्या प्रगतीत तसूभरही वाढ झाली नसल्याचे दिसते. दुसरा मुद्दा म्हणजे एखाद्या दुर्दैवी घटनेचेही राजकारण कसे करावे हे बिहारमधील नेत्यांनाच जमते. अशा घटनेतही ते आपला हात धुवून घेतात. पण कोरोनाच्या काळात बिहारमधील स्थलांतरीत कामगारांची महाराष्ट्राने कशी काळजी घेतली याच्या अनेक बातम्या, व्हिडीओ आपण पाहिले आणि हेच लोक बिहारमध्ये गेल्यानंतर त्यांचे कसे हाल झाले हेही पाहिले. तरीही हेच लोक याबाबत मात्र काही बोलत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. त्या-त्या राज्यात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या भूमिपुत्रांना मिळाल्या पाहिजेत, असे माझे म्हणणे आहे. पण नोकऱ्या निर्माण करण्याची ताकदही त्या राज्यातील नेत्यांमध्ये पाहिजे. महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये अशी ताकद दिसते, ती बिहारसारख्या नेत्यांमध्ये का नाही हाही प्रश्न आहे.”

Previous articleपृथ्वीराज चव्हाण,मिलिंद देवरांना राज्यात फिरू देणार नाही;काँग्रेसच्या मंत्र्याने दिला इशारा
Next article…. तर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू !