पत्रकारांच्या प्रश्नासाठी आ.रोहित पवारांची लक्षवेधी;राज्यमंत्री अदिती तटकरेंची दिलासादायी घोषणा

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील पत्रकारांसाठी असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतून मदत मिळवण्यासाठी ३० वर्षांच्या अनुभवाची अट आहे, ती शिथील करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच ज्यांच्याकडे अधिस्विकृती नाही मात्र ३० वर्षांचा अनुभव आहे, अशा पत्रकारांनाही मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी मंगळवारी विधानसभेत स्पष्ट केले. तसेच जे पत्रकार निवृत्तीला आलेले आहेत किंवा निवृत्त झालेले आहेत,त्यांनाही या योजनांमधून मदत मिळेल असा प्रस्ताव विभागाला दिला जाईल, असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात पत्रकारांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीची स्थापना २००९ साली केलेली आहे. मात्र २०१६ नंतर या निधीत वाढ केलेली नाही.ती वाढ करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लक्षवेधी विधानसभा सभागृहात मांडली.शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनेत अधिकृतीस्विकृती धारक पत्रकारांनाच लाभ मिळावा असे निकष होते. या योजनेसाठी दिलेला निधी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवीच्या स्वरुपात ठेवलेला असून त्यातून मिळालेल्या व्याजातून पत्रकारांना मदत दिली जाते. आज या व्याजापोटी मासिक सहा लाख मिळत असून पत्रकारांना मदत देण्यासाठी प्रति माह १८ लाखांची मागणी आहे. तसेच अधिस्विकृतीधारक पत्रकारांची संख्याही काळानुसार वाढत आहे. त्यामुळे यात वाढ व्हावी अशी अपेक्षा पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

या योजनेंतर्गत अधिस्विकृतीधारक पत्रकार व त्याची पत्नी,पती तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेली मुले यांना वैद्यकीय उपचारार्थ आर्थिक मदत देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आजवर २५८ पत्रकार व त्यांचे कुटुंबिय यांना एकूण रु.१ कोटी ५८ लाख ५२ हजार ७११ एवढी रक्कम वैद्यकिय कारणास्तव आर्थिक मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकारांना सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये केशरी व पिवळे शिधापत्रिकाधारक किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला असलेल्या पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे राज्यातील पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांना याचा फायदा झाला आहे. याच दृष्टीकोनातून महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये पत्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे असे राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीत पूर्वी १० कोटी रुपयांची तरतूद होती. गेल्या दोन वर्षात त्यामध्ये आणखी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहितीही तटकरे यांनी दिली.महाराष्ट्र राज्यातील प्रसारमाध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्ये पार पाडत असताना त्यांच्यावर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि प्रसारमाध्यमातील व्यक्ती किंवा प्रसारमाध्यम संस्था यांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा हानी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी तसेच अनुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता त्याअंतर्गत आजवर २९ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यावरही निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous articleनियमबाह्य पध्दतीने विक्री केलेल्या सुमारे ४० सहकारी साखर कारखान्यांची चौकशी करा
Next article‘काश्मीर फाईल्स’ मधून जमा झालेल्या १५० कोटीतून कश्मिरी पंडितांसाठी घरं बांधा