मुंबई नगरी टीम
ठाणे : कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे, त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही, असा सतर्कतेचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिका करत असलेल्या कोरोनाच्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज ठाणे दौरा केला. यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाला काही महत्वाच्या सुचना दिल्या आहेत.
लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, यामुळे गाफील राहून चालणार नाही. कायम सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करुन आणि नागरिकांनी नियमांचे पालन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनासह इतर बाबीवर लक्ष केंद्रीत करावे, असे सांगताना मुख्यमंत्र्यानी पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष करु नका, अशाही सुचना केल्या आहेत. शिवाय हळूहळू सर्व मुळ पदावर आणायचे आहे. या अनुषंगाने कोरोना दक्षता समिती प्रत्येक वॉर्डात स्थापन करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित पालिका आयुक्त आणि अधिका-यांना दिले आहे.