मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करावे

मुंबई नगरी टीम

मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिगर भाजप राज्यांना एकत्र येण्याचे आवाहन करताना केंद्र सरकारला घाबरायचे की विरोधात लढायचे, असे ठरवण्यास सांगितले.यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट करत उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्वाची मानसिकता असल्याचे म्हटले आहे.तसेच त्यांनी या सगळ्याचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर करावे, असे मत संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना व्यक्त केले.

यावर अधिक बोलताना संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे कधीही आडपडदा ठेवून बोलत नाही. केंद्र सरकार विरोधात लढण्याची तयारी करताना त्यांनी बिगर भाजपशासित राज्यांना आवाहन केले. या सगळ्याचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्तरावर करावे, असे माझे वैयक्तिक मत आहे.उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्वाची मानसिकता होताना मला दिसत आहे”,असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच महाराष्ट्राने आता राष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवायला हवी, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी देखील भाष्य केले. काँग्रेसमध्ये जे काही घडले त्यावर काँग्रेसने बोलले पाहिजे.काँग्रेसला मोठी परंपरा असून सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे”,असे संजय राऊत म्हणाले. तसेच संपूर्ण देशात ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील असे राहूल गांधीच दिसतात. ते सक्षम आहेत. काँग्रेसने या वादळातून सावरून पुन्हा काम सुरू करावे, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. दरम्यान, जीएसटी नुकसान भरपा्ई आणि विद्यार्थ्यांच्या परिक्षेच्या मुद्द्यावरून बुधवारी बिगर भाजपशासित राज्यांची बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी झाले होते. तर केंद्राविरोधात लढण्याची भूमिका देखील त्यांनी यावेळी मांडली होती.

Previous articleसरकारने विरोध केला तरी मशिदी उघडणारच! 
Next articleमुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि आमदारांना कोरोना चाचणीचा अहवाल सादर करावा लागणार