सरकारने विरोध केला तरी मशिदी उघडणारच! 

मुंबई नगरी टीम

औरंगाबाद : राज्यातील धार्मिक स्थळे आता खुली करावीत,अशी मागणी सामान्य जनता ते विविध पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे.या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला आहे.सरकारने विरोध केली तरी आम्ही २ सप्टेंबरपासून मशिदी उघडणार आहोत,असे त्यांनी म्हटले. १ सप्टेंबरपासून सर्व मंदिरे खुली करा,असा अल्टिमेटम सरकारला देत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.आपल्या सोशल मिडीया अकाउंटवरुन त्यांनी याबाबातचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

आम्ही सर्वजण आपल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सहा महिने थांबलो आणि सरकारला सहकार्य केले.या सहा महिन्यात विविध धर्मांचे जितके मोठे सण आले ते सर्व नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन करून घरी साजरा केले.सहा महिन्यानंतर अनेक उद्योगधंदे, कार्यालये,मार्केट, बसेस सुरू झाले आहे.मग केवळ धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे कारण काय? आम्ही सरकारला अल्टिमेटम देत आहोत. १ तारखेला गणपती विसर्जन आहे. हिंदू बांधवांसाठी खुप महत्त्वाचा दिवस आहे. सरकारने १ तारखेपासून सर्व मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी.आम्ही आमच्या सगळ्या मशिदी २ तारखेपासून खुल्या करणार. तुम्हाला ज्या अटी टाकायच्या असतील त्या टाका, पण आम्ही मशिदी उघडणार. खुप झाले आता तुमचे, असे आव्हान जलील यांनी सरकारला दिले आहे.

दरम्यान, कोरोनाचे सावट असल्याकारणाने यंदाचे अनेक सण साध्या पद्धतीनेच साजरा करण्यात आले. मात्र आता सहा महिने होऊनही सरकार धार्मिक स्थळे खुली करण्याबाबत निर्णय घेत नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांसह अनेकांनी धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी केली आहे. तर या मुद्द्यावरूच भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीने २९ ऑगस्टला घंटानाद आंदोलन पुकारले असून मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे.

Previous articleMPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या ; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय
Next articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करावे