मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील अनलॉकचा तीसरा टप्पा ३१ ऑगस्टला पूर्ण होणार आहे.त्यामुळे,सप्टेंबरमध्ये शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर शिक्षणमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.
३१ ऑगस्टपर्यंत शाळा सुरू करता येणार नाही. कारण केंद्रीय गृहमंत्रालय यासंदर्भातील निर्णय घेते. शाळा,महाविद्यालयांसह सर्वच गोष्टी सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय घेते.केंद्र सरकारच्या माध्यमातून जर शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाली.तर,प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आधी दहावीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करू. त्यानंतर नववी व इतर इयत्तांसाठी शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे”, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून शाळा व इतर शैक्षणिक संस्था बंद आहेत. तर राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असून त्याचा तिसरा टप्पा संपत आला आहे. त्यामुळे अनलॉ कच्या चौथ्या टप्प्यात नेमके कोणते नियम शिथिल केले जातील. तसेच शाळा कधी सुरू करणार याबाबत सरकारचा काय विचार आहे, असा प्रश्न राज्यातील सर्वच विद्यार्थी आणि पालकांना पडलेला आहे.दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राच्या परवानगीनंतरचा शाळा सुरू करण्याबाबत सरकार विचारधीन असेल.