मुंबई नगरी टीम
मुंबई : विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यार्थ्याच्या आरोग्याचा विचार करून अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा पध्दतीने घ्यायच्या यासंदर्भात आज कुलगुरूंबरोबर बैठक घेवून चर्चा केली.प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार नाही असे कुलगुरू आणि सरकारचे मत आहे,तसा आमचा प्रयत्न राहिल अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी या बैठकीनंतर दिली.
कोरोनाच्या संकटात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असा निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज कुलगुरूंबरोबर अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलवून परीक्षा घेणे शक्य नाही. असे मत या बैठकीत अनेक कुलगुरूंनी मांडले. विद्यार्थ्यांना कसलाही त्रास न होता सोप्या पद्धतीने कशी परीक्षा घेता येईल,याचा अहवाल देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
परीक्षां घेण्याबाबत इतर पर्यायांचा विचार करून कशी परीक्षा घ्यायची याचा निर्णय घेतला जाईल. ओपन बूक किंवा असाईनमेन्टवर आधारित परीक्षा घेण्याचा विद्यार्थ्यांचा आग्रह आहे. विद्यार्थ्यांचे मत लक्षात घेऊन आम्ही त्या दृष्टीने विचार करत आहोत.ऑफलाइन,ऑनलाइन,नेहमी घेतो तशी ओपन बूक,असाईनमेन्ट बेस अशा पाच पद्धतीने परीक्षा घ्या,असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसीने) सांगितल्याचे सामंत म्हणाले. मुबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती परीक्षा कशी घ्यायची याबाबतचा आपला पहिला आहवाल देणार आहे.यामध्ये येत्या ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेता येईल का ? हा महत्वाचा मुद्दा असेल. परीक्षा कशी घ्यायची याबाबत समिती इतर कुलगुरूंशी आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करतील. बॅकलॉग, अंतिम वर्ष, तंत्र विद्यापीठ यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या याचा अहवाल समिती देणार असल्याचेही सामंत स्पष्ट केले.सध्याच्या कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येणार नाही असे सांगतानाच,या परीक्षा सोप्यात सोपी पध्दतीने घेतली जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
या समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांचा विचार करून परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यावर उद्या ३० ऑगस्ट रोजी बैठक घेऊन आपला अहवाल सादर करावा. समितीच्या निर्णयानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले बैठकीत गोवा, दिल्ली,मध्यप्रदेश,बनारस विद्यापीठ यांनी कशा पद्धतीने तेथील परीक्षा घेतल्या आहेत,याचाही सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला.