महाड दुर्घटनेत ३५ जणांचे प्राण वाचवणाऱ्या नावेदला मंत्री उदय सामंतांनी दिला धीर

मुंबई नगरी टीम 

मुंबई :  गेल्या सोमवारी महाड येथे झालेल्या तारीक पॅलेस इमारत दुर्घटनेत १६ जणांना जीव गमवावा लागला तर अनेक जखमी झाले.या दुर्घटनेतील तब्बल ३५ जणांचे जीव वाचविणारे  नावेद यांना आपला एक पाय गमवावा लागला आहे.नावेद यांच्यावर सध्या नेरुळ येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून,राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन नावेद यांच्या प्रकृतीची विचारपुस केली.केवळ धीरच नव्हे;तर मंत्री सामंत यांनी नावेदला उपचारासाठी शिवसेनेच्यावतीने दोन लाखाची  आर्थिक मदत केली.

गेल्या सोमवारी महाड येथील तारीक पॅलेस ही ७ वर्ष जुनी असणारी पाच मजली इमारत कोसळल्याने या दुर्घटनेत १६ जणांना जीव गमवावा लागला आहे.तर अनेक जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.अनेकांवर सध्या विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असल्याचे समजताच नावेद या तरूणाने आपल्या जीवाची पर्वा न करता या  ढिगा-या खाली अडकलेल्या व्यक्तींना वाचविण्यासाठी धाव घेतली. नावेदने या दुर्घटनील तब्बल ३५ जणांचे प्राण वाचविले. दुर्घटनील लोकांना मदत करीत असतानाच नावेदला दुर्दैवाने या घटनेत आपला एक पाय गमवावा लागला आहे.नावेद जखमी असताना त्याला नेरुळ येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.सध्या नावेदवर उपचार सुरू असून,नावेदची प्रकृती आता उत्तम असून त्याच्यावर उत्तम रित्या उपचार सुरू आहेत येत्या पाच दिवसात नावेदला डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

महाड मधील तारीक पॅलेस इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच रात्री दोनच्या सुमारास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दुर्घटना स्थळी भेट देवून मदतकार्याची पाहणी केली.त्यांनतर दुस-या दिवशीही सामंत यांनी मदतकार्याची आढावा घेवून सूचना केल्या.आज मंत्री सामंत यांनी नेरुळ येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये नावेदची भेट घेवून प्रकृतीची विचारपूस केली.नावेदची प्रकृती आता उत्तम असून त्याच्यावर उत्तम रित्या उपचार सुरू आहेत. येत्या पाच दिवसात नावेदला डिस्चार्ज मिळणार असून डिस्चार्ज पैशासाठी थांबवला जाणार नाही याची ग्वाही हॉस्पिटल प्रशासनाने सामंत यांना दिली आहे.यावेळी शिवसेनेच्या वतीने उदय सामंत यांनी दोन लाखांची मदत नावेदच्या उपचारासाठी दिली आहे.

Previous articleकिरीट सोमय्यांचा महापौरांवर गंभीर आरोप;आर्थिक व्यवहाराच्या चौकशीची केली मागणी
Next articleई-पास रद्द केल्यानंतर आता राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी; उद्यापासून बुकिंग सुरू