मुंबई नगरी टीम
पुणे : वेळेवर उपचार न मिळाल्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. कोविड सेंटरमधून रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने पांडुरंग यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभावर आज पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.तर खुद्द उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील यावर मौन बाळगले आहे. प्रशासनाच्या बेजबाबदारपणाला पांडुरंग हे बळी पडले असून,त्याला जबाबदार कोण?, असा प्रश्न आता विचारला जात आहे. मात्र अजित पवारांनी या प्रश्नांना उत्तर न देणेच पसंत केले आहे. त्यामुळे राज्यातील पत्रकारांनी सरकार विरोधातील आपला आक्रोश वक्त केला आहे.
पांडुरंग रायकर यांना पुण्यातील जम्बो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे प्रयत्न त्यांच्या पत्रकार मित्रांनी केले.जम्बो रुग्णालयातून त्यांना दुसरीकडे नेण्यासाठी कार्डिअॅक रुग्णवाहिकेची गरज होती.मात्र रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने पांडुरंग यांना आपला जीव गमवावा लागला.या धक्कादायक प्रकारानंतर पत्रकारांनी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रशासनाच्या या हलगर्जीपणावर प्रश्न विचारला. मात्र अजित पवारांनी यावर मौन बाळगले.रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध का झाली नाही यावर अजित पवारांनी कोणतेही उत्तर न देता पत्रकारांना टाळले. त्यामुळे पत्रकाराच्या अशा दुर्दैवी मृत्यूवर अजित पवार असंवेदनशील असल्याची टीका पत्रकारांनी केली आहे.
पांडुरंग रायकर हे टीव्ही ९ मराठीचे पुण्यातील प्रतिनिधी होते.सुरुवातीला पांडुरंग यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर पांडुरंग आपल्या अहमदनगर येथील कोपरगावी गेले होते. मात्र काही दिवसांनंतर त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागला होता.त्यानंतर कोपरगाव येथे त्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात आणण्यात आले असून इथल्या जम्बो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी १ सप्टेंबरला त्यांची ऑक्सिजनची पातळी ७८ टक्क्यांपर्यंत खाली गेली. त्यामुळे त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेण्यासाठी कार्डिअक रुग्णवाहिकेची गरज होती. आधी एक रुग्णवाहिका जम्बो रुग्णालयाजवळ पोहोचली, मात्र त्यातील व्हेंटिलेटर खराब होते. दुसरी रुग्णवाहिका मिळवण्यासाठी पहाटेचे चार वाजले. मात्र तोवर पांडुरंग यांची प्रकृती अधिक खालावली. दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून एक रुग्णवाहिका जम्बो हॉस्पिटलला पोहोचली मात्र तोपर्यंत पांडुरंग यांचा मृत्यू झाला होता.