काही श्रीमंत लोकांमुळे आयसीयू बेडची कमतरता : राजेश टोपेंची प्रतिक्रिया

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोची लक्षणे नसताना देखील काही श्रीमंत लोक आयसीयू बेड अडवून बसतात. त्यामुळे आयसीयू बेडची कमतरता भासते.याबाबत जागरूक राहिले पाहिजे, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आरोग्यमंत्री मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.तसेच या मृत्यूप्रकरणाची चौकशी करु,असे आश्वासन राजेश टोपे यांनी यावेळी दिले.

यावर अधिक बोलताना राजेश टोपे म्हणाले, “लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना आयसीयू बेड देऊ नयेत. काही श्रीमंत लोक कोरोनाची लक्षणे नसताना देखील आयसीयू बेड अडवतात हे दुर्दैवी आहे. त्यामुळे लक्षणे नसताना आयसीयू बेड अडवणाऱ्यांना थांबवले पहिले”, असे राजेश टोपे यावेळी म्हणाले. “या घटनेत वेळेत रुग्णवाहिका न मिळणे हे दुर्दैवी आहे. त्याचे समर्थन होऊ शकत नाही. अशा घटना घडू नये म्हणून नियम बनवले आहेत. त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कडक आदेश दिले आहेत की, कुठल्याही परिस्थितीत आपण रुग्णवाहिका भाड्याने घ्या. आणि रुग्णांना त्याची मोफत सुविधा पूरवा. अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेतली जाईल. या प्रकरणाची चौकशी करू”, असे आश्वासन टोपे यांनी यावेळी दिले.

दरम्यान, या घटनेनंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही दुःख व्यक्त करत प्रशासनाची चूक मान्य केली आहे. पांडुरंग यांच्या मृत्यूला व्यवस्थेतील त्रुटी जबाबदार आहे, हे आपण मान्य करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली. या सर्व प्रकारानंतर प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा समोर आला असून पांडुरंग यांच्या कुटुंबियांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे.

Previous articleपत्रकाराच्या मृत्यूवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मौन
Next articleअंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होणार !