मुख्यमंत्र्यांनी विदर्भाला वाऱ्यावर सोडले, काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर

मुंबई नगरी टीम

नागपूर : पूर्व विदर्भाला पुरचा फटका बसला असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.अशा पूरपरिस्थितीत सरकारने मात्र विदर्भाला वाऱ्यावर सोडले असल्याची टीका काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी केली आहे.विदर्भात पुराचे संकट ओढवलेले असताना मुख्यमंत्र्यांनी किमान हवाई दौरा करून याची पाहणी करायला हवी होती,अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणास्तव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. मात्र जेव्हा पूर येतो, जीवितहानी झाली, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.अशावेळी एक हवाई दौरा उद्धव ठाकरेंनी करावायला होता.विदर्भाला वाऱ्यावर सोडण्याची भूमिका सरकारची आहे का?” असा प्रश्न यामुळे जनतेसमोर असल्याचे आशिष देशमुख म्हणाले.तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही विदर्भात अजूनही पाहणी दौरा केलेले नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपेही विदर्भात फिरकले नाहीत.नागपुरमध्ये कोरोनाची भयानक परिस्थिती आहे. मात्र राजेश टोपे अजूनही नागपुरात का आले नाही?, असा सवाल आशिष देशमुख यांनी उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

कोरोनाचे संकट दारात असताना पूर्व विदर्भाला पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पीकहानी, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांना भेटी देणे अपेक्षित असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्याकडे बोट दाखवल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये पुन्हा शाब्दिक दरी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Previous articleमोठा निर्णय : आता ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना मिळणार कर्ज
Next articleसरकारचा महत्वाचा निर्णय : मुंबईतील हा प्रकल्प ठरणार जगातील पहिले उदाहरण