मुंबई नगरी टीम
मुंबई : वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सभागृहात केली.चौकशीअंती दोषी आढळलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.
अलिबाग येथील मराठी वास्तू विशारद अन्वय नाईक अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबाग येथे आत्महत्या केली होती. याच ठिकाणी अन्वय यांच्या आईचा देखील मृतदेह आढळून आला होता. अन्वय यांनी आत्महत्येपुर्वी लिहून ठेवलेल्या एका चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे नाव लिहून आपल्या आत्महत्येला जबाबदार धरले होते. तसेच अन्य दोघांचीही नावे यामध्ये नमुद करण्यात आली होती. मात्र तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून अर्णब यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप नाईक कुटुंबाकडून करण्यात आला होता.नाईक कुटुंबाची अशी अवस्था पाहून आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याच्या गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती.तर ज्याप्रमाणे सुशांतच्या प्रकरणात सीबीआय दखल देते,सीआयडी दखल देते, बिहार पोलिस दखल देते. मुंबई पोलिसांकडून चांगल्या प्रकारे तपास सुरू असतानाही जर इतर पोलीस खात्याने लक्ष देण्याची गरज असेल तर,अन्वय नाईक यांच्या प्रकरणात सुद्धा बारकाईने तपास करून त्यांच्या पत्नीला न्याय द्यावा अशी भूमिका शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी घेत “विद्यमान सरकारच्या काळात अक्षता नाईक यांना नक्कीच न्याय मिळेल” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.
आज विधानसभेत शिवेसनेचे सदस्य प्रताप सरनाईक यांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणासंदर्भात कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.तर सुनिल प्रभू, ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांनीही गुन्हेगारास तत्काळ अटक करण्याची मागणी यावेळी केली.त्यांच्या निवेदनास उत्तर देताना गृहमंत्री यांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली.चौकशीअंती दोषी आढळलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.गृहमंत्री देशमुख यांच्या या घोषणेमुळे अन्वय यांनी आत्महत्येपुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नाव असेलेले पत्रकार अर्णब गोस्वामी अडचणीत येण्याची शक्यता आहे.