कंगनाच्या अडचणीत वाढ,ड्रग्स प्रकरणी चौकशी करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई आणि महाराष्ट्राबाबत केलेली वादग्रस्त विधाने तिला चांगलीच भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कंगनाची कुंडली आता बाहेर काढली जाणार असून ड्रग्स प्रकरणी तिचीही चौकशी करण्यात येणार आहे.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भातील माहिती आज विधानसभेत दिली आहे.महाराष्ट्राचा अपमान करणा-या कंगनाविरोधात कारवाई करावी अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत सभागृहात ही माहिती दिली.

कंगना राणावतचे अध्ययन सुमनशी प्रेमसंबंध होते. त्याने एका मुलाखतीत असे सांगितले होते की, कंगना ड्रग्ज घेते आणि मलाही घेण्यासाठी बळजबरी करते. या प्रकरणी आता मुंबई पोलीस माहिती घेतील, असे अनिल देशमुख म्हणाले. त्यामुळे आता कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गृहमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर कंगनाने स्वतः आपली ड्रग्स चाचणी करण्यास सांगितले आहे.गृहमंत्री देशमुख यांनी ड्रग्स प्रकरणी कंगनाची चौकशी केली जाईल, असे म्हटले आहे. यावर कंगनाने लगेच एक ट्वीट करत आपण यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. “माझी ड्रग्सची चाचणी करा, माझे कॉल रेकॉर्डस् ही तपासा. यात जर ड्रग्स पेडलरशी संबंधित काही लिंक सापडली तर, मी माझी चूक कबूल करण्यास तयार होईन आणि कायमची मुंबई सोडेन”, असे कंगनाने म्हटले आहे.

आज सभागृहात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह कंनाविरोधातही हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला.काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे सदस्य भाई जगताप यांनी विधान परिषदेत याबाबत प्रस्ताव मांडला.हा केवळ हक्कभंग नसून ती मुंबई, महाराष्ट्राशी कंगनाने केलेली गद्दारी आहे, असे भाई जगताप म्हणाले. दरम्यान, या हे सर्व प्रकरण अधिक गंभीर होताना दिसत आहे. तरी देखील कंगनाने आपली भूमिका आक्रमक ठेवली असल्याचे चित्र तिच्या ट्वीटवरून दिसत आहे.

Previous articleवास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची चौकशी
Next articleआता वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे सूत्र ‘वन महाराष्ट्र,वन मेरिट’ असणार