मुंबई नगरी टीम
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी पत्रकार अर्णब गोस्वामींच्या मुद्द्यावर विधानसभेत गदारोळ झाला. रिपब्लिक वृत्त वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या विरोधात शिवसेनेचे सदस्य आक्रमक झाले.अर्णब गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत,असा हल्लाबोल शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव यावेळी सभागृहात सादर केला.
अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस चांगलाच गाजला.अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही.तरी देखील अर्णब गोस्वामी स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत आहेत.ते हेतूपुरस्सर आणि दुष्ट बुद्धीने वाईट बोलत आहेत.अर्णब यांची रिपब्लिक टीव्ही ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी”,अशी मागणी शिवसेनेचे सदस्य प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यासह परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी केली आहे.अर्णब गोस्वामी हे स्वत: नायायाधीशाच्या भूमिकेत आहेत, स्वत: खटला चालवत आहेत. तर निकालही स्वत:च देत आहेत”, अशी टीका परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली. यावर अधिक बोलताना अनिल परब म्हणाले, “अर्णब स्वतःला न्यायाधीश समजतात का ? हे कोण पत्रकार आहेत ?, ते सुपारी घेऊन काम करतात. घटनेनुसार प्रसारमाध्यमांनाही चौकट दिली आहे.पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा विधिमंडळाने केला. मात्र एखादा पत्रकार जेव्हा लोक प्रतिनिधींबद्दल काही बोलतो त्यावर कारवाई व्हायला नको का ?, असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवसेना सदस्य प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव यावेळी सभागृहात सादर केला.
दरम्यान, राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी देखील अर्णब गोस्वामीच्या वागणूकीवर टीका केली आहे. सुशांतसिंह प्रकरणाविषयी वार्तांकन करताना अर्णब गोस्वामींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर आज विधिमंडळात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत अर्णब यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.