मुंबई नगरी टीम
मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद सध्या धुमसत आहे. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनावर टीका केल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला.त्यानंतर कंगनाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकेरी उल्लेखावर संजय राऊत काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष होते. मात्र संजय राऊत यांनी यावर आता मौन बाळगणेच पसंत केले आहे. माध्यमांनी कंगनाने केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असताना संजय राऊतांनी यावर सविस्तरपणे बोलण्यास नकार दिला. त्यामुळे कंगना प्रकरणावरून संजय राऊतांनी माघार घेतली का ?, अशी चर्चा रंगली आहे.
माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला थोडक्यात प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले,”मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी, तिथे एक कायदेशीर विभाग आहे. या संबंधित तुम्ही महापौरांशी बोलू शकता. ज्या गोष्टी मला माहित नाही त्यावर मत व्यक्त करणार नाही”, असे संजय राऊत म्हणाले. तर मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याच्या प्रश्नानावर ११ कोटी मराठी जनतेने ते ऐकले असल्याचे राऊत म्हणाले.त्यामुळे शिवसेनेसाठी कंगना हा विषय आता संपला का?, अशी चर्चा आहे.
कंगनाच्या पाकव्याप्त कश्मीर या विधानावरून संजय राऊत यांनी तिचा हरामखोर असा उल्लेख केला होता. संजय राऊत यांच्या या शब्दावर अनेकांनी आक्षेप नोंदवला. तरी देखील कंगनाने तिने केलेल्या विधानावर आधी माफी मागावी त्यानंतर आपण माफी मागण्याचा विचार करू,अशी भूमिक राऊतांनी घेतली. त्यात बुधवारी कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या मनपाच्या कारवाईमुळे वादाला अधिक ठिणगी पडली. दरम्यान, ‘मातोश्री’वरून शिवसेनेच्या प्रवक्तव्यांना कंगना प्रकरणावर काहीही न बोलण्याची सूचना देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख होऊनही संजय राऊत यांनी बाळगलेले सूचक मौन अनेक चर्चांना तोंड फोडत आहे.