मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यापासून रखडलेल्या राज्यातील रिक्त असलेल्या विविध महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच केल्या जाणार आहे.कोणत्या पक्षाला कोणते महामंडळ द्यायचे हे या अगोदरच निश्चित झाले आहे. तर महामंडळावरील नियुक्त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी महामंडळावर नियुक्त्यांसाठी कार्यकर्त्यांची नावे मागावण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या असल्याचे समजते.त्यामुळे महाविकास आघाडीतील नावांच्या निवड प्रक्रियेला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.
राज्यातील भाजपचे सरकार जावून आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून जवळ जवळ आठ महिन्याचा कालावधी उलटला आहे. जानेवारी आणि फेब्रूवारी महिना हा सरकार स्थिर होण्यात गेला तर मार्च महिन्याच्या शेवटी राज्यात कोरोनाचे संकट आल्याने कोरोनावरील उपाय योजने शिवाय इतर कामकाज गेली सहा महिने कामकाज ठप्प आहे.काही महिने मंत्रालयातील कामकाजही काही अधिका-यांच्या उपस्थित करावे लागत होते.तर याच प्रश्नावर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केल्याचे चित्र होते.निवडणूकीत पक्षासाठी झटणारे कार्यकर्ते पदाधिकारी एखादे पद पदरात पडेल या आशेवर होते.मात्र कोरोनामुळे त्यांच्याही स्वप्नावर पाणी फिरल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात नाराजी निर्माण झाली होती.दुसरीकडे आघाडीतील घटक पक्षांमध्येही नैरास्याचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध महामंडळांचे कामकाज ठप्प असल्याने अशा महामंडळांचे कामकाज सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.महामंडळाना मुहूर्त देऊन राज्यातील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यावर या दोन नेत्यांच्या बैठकीत एकमत झाल्याचे समजते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महामंडळांच्या नियुक्त्या करण्यास होकार दिल्याचे सांगण्यात येते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गुरूवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या बैठकीत या महामंडळावरील नियुक्त्यांसाठी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या नावाची शिफारस करण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येते.काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कोणत्या पक्षाला कोणते महामंडळ द्यावे याचा निर्णय सरकारने स्थापन करतावेळीच घेण्यात आला होता.त्यानुसार महिनाभरात राज्यातील विविध महामंडळांवरील नियुक्त्या होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.