तर उभ्या महाराष्ट्राची माफी मागेन : एकनाथ खडसे

मुंबई नगरी टीम

जळगाव : माझ्याकडे जे पुरावे आहेत ते मी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले आहेत. त्यावर अजूनही कारवाई झालेली नाही.चर्चेसाठी मी तयार आहे.जर मी दोषी असेन तर उभ्या महाराष्ट्रातील जनतेसमोर उभा राहून माफी मागेन,सांगेन मी भ्रष्ट आहे,असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले. एमआयडीसी जमीन प्रकरणामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.यावर खडसेंनी प्रतिप्रश्न विचारात फडणवीसांवर पलटवार केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत खडसे बोलत होते.

माझ्यामुळे नव्हे तर एमआयडीसी जमीन प्रकरणामुळे एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता. तर घरची धुनी मी रस्त्यावर धूत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. पंरतु फडणवीसांनी केलेल्या या दाव्यावर एकनाथ खडसेंनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एमआयडीसी प्रकरणात माझा राजीनामा घेतला तर तो कुठल्या कारणासाठी ? एमआयडीसीच्या जमिनीशी माझा संबंध नाही. ही कथित जमीन माझी बायको आणि जावयाने घेतली.याबाबत माझा व्यवहार झालेला नाही. मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध ?, असा सवाल यावेळी खडसेंनी केला.मंत्री असताना माझ्या कुटुंबाने व्यवहार करायचे नाहीत का ? समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला.तर तो देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा केलेला गैरवापर होतो ?, असा पलटवार एकनाथ खडसे यांनी केला.

या जमिनीशी माझा काहीही संबंध नाही हेच सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी चर्चेसाठी तयार आहे. मात्र या संदर्भात केवळ एकच बाजू ऐकण्यात आली. माझी बाज ऐकलीच नाही. आजही मी चर्चेसाठी तयार आहे. यामध्ये मी दोषी असेन तर महाराष्ट्राच्या जनतेसमोर माफी मागेन, अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी यावेळी मांडली. दरम्यान, वारंवार एकनाथ खडसे आणि देवेंद्र यांच्यातील हा वाद आता अधिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे दिल्लीतील पक्षश्रेष्टींकडून यावर काही निर्णय घेतला जाईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleमराठा आरक्षणाचा प्रश्न आंदोलनाने सुटणार नाही : शरद पवार
Next articleकार्यकर्त्यांना खुशखबर : महामंडळावरील नियुक्त्या लवकरच होणार